राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला आली जाग; जेसीबी घेऊन सकाळीच पोहचले अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 08:46 AM2023-03-23T08:46:25+5:302023-03-23T08:46:48+5:30
माहिमजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर केलेल्या भाषणानंतर आता मुंबई महापालिका खडबडून जागी झाली आहे. माहिम येथील समुद्रात अनाधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या मदारीचे फोटो, व्हिडिओ राज यांनी सभेत प्रदर्शित केले. त्यानंतर येत्या महिनाभरात हे बांधकाम न हटवल्यास त्याच्याशेजारीस सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा थेट इशाराच जाहीर सभेतून प्रशासनाला दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर अवघ्या काही तासांत मुंबई महापालिकेचे अधिकारी या जागेवर पोहचले. याठिकाणी अधिकाऱ्यांकडून मॅपिंग करण्याचं काम सुरू झाले आहे. महापालिकेसोबतच मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारीही कथित मजारीस्थळी पोहचले असून याठिकाणी जीपीएस यंत्रणेद्वारे सर्चिंग केले जात असून या जागेची काही नोंद आहे का याबाबत पडताळणी केली जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर सरकारने गांभीर्याने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे.
त्याचसोबत माहिमजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. जेसीबी आणि हातोडे घेऊन कर्मचारी दाखल झाले. जे अनाधिकृत बांधकाम असेल ते तातडीने पालिकेकडून हटवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, पालिका आणि पोलीस प्रशासन एकत्रितपणे ही कारवाई करणार असून सध्या घटनास्थळी कुणालाही प्रवेश दिला जात नाही.
समुद्रसपाटीपासून आतमध्ये कुठल्याही बांधकामाला परवानगी नसते. जर बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. माहिम दर्गा प्रशासनाकडून ही जागा शेकडो वर्षापासून आहे असा दावा केला जात आहे. परंतु जर या जागेची कुठलीही सरकारी नोंद नसेल तर ती ही जागा अनाधिकृत मानली जाते. राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात या अनाधिकृत जागेचा व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यानंतर महिनाभरात हे बांधकाम तोडावं असा इशारा दिला. जर प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही तर त्याचशेजारी मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा राज यांनी सरकारला दिला होता. त्यानंतर आता माहिम दर्गा परिसरात हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे.