माहीम पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:35 AM2018-03-20T01:35:23+5:302018-03-20T01:35:23+5:30
एका आॅर्केस्ट्रा चालकाकडून २० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद इडेकर (५०) व त्यांचा आॅर्डली कॉन्स्टेबल संदीप तेली (४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली.
मुंबई : एका आॅर्केस्ट्रा चालकाकडून २० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद इडेकर (५०) व त्यांचा आॅर्डली कॉन्स्टेबल संदीप तेली (४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली. आॅर्केस्ट्रा बारवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तेलीच्या माध्यमातून लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आॅर्केस्ट्रा बारवर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्यावर महाराष्टÑ पोलीस कायद्यान्वये दंडात्मक कारवाई केली होती. मात्र आयपीसी २९४ कलमान्वये गुन्हा दाखल न करण्यासाठी, तसेच भविष्यात छापा न टाकण्यासाठी बारमालकाकडे तेलीने ५० हजारांची मागणी केली. हा सौदा ४० हजारांवर निश्चित करून सोमवारी २० हजारांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले. मात्र बारचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यांनी रचलेल्या सापळ्यानुसार तेली २० हजार रुपये स्वीकारत असताना त्याला पकडले. वरिष्ठ निरीक्षकासाठी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाल्याने इडेकरला अटक करण्यात आली.