माहिममध्ये पोलिसाच्याच घरात चोरी, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 06:00 AM2018-12-05T06:00:41+5:302018-12-05T06:00:50+5:30
नातेवाइकाच्या लग्नासाठी पुण्यात गेलेल्या पोलिसाच्याच घरात लाखोंची चोरी झाल्याचा प्रकार रविवारी माहिममध्ये उघडकीस आला.
मुंबई : नातेवाइकाच्या लग्नासाठी पुण्यात गेलेल्या पोलिसाच्याच घरात लाखोंची चोरी झाल्याचा प्रकार रविवारी माहिममध्ये उघडकीस आला. यामुळे माहिम पोलीस वसाहतीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अनोळखी लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.
माहिमच्या नवीन पोलीस वसाहतीत प्रदीप ज्ञानदेव खरात (३३) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते मुंबई पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. ३० नोव्हेंबर रोजी खरात हे नातेवाइकाच्या लग्नानिमित्त घर बंद करून पुण्याला गेले होते.
याच दरम्यान त्यांचे घर फोडून चोरी करण्यात आली. ही बाब शेजारी राहणाऱ्या धनेश कदम यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत तातडीने खरात यांना माहिती दिली. आपल्या घरात चोरी झाल्याचे कदम यांच्याकडून समजताच खरात तातडीने घरी परतले. तेव्हा घरातील ११ हजारांच्या रोकडीसह लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
खरात यांनी या प्रकरणी माहिम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या चोरीमागे तेथे जवळच असलेल्या झोपडपट्टीतील गर्दुल्ल्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू असल्याचे माहिम पोलिसांनी सांगितले.
>यापूर्वीच्या पोलिसांच्या घरातील चोरीच्या घटना
३० जुलै २०१७ - राज्य दहशतवादविरोधी विभागात कार्यरत नीलेश मोहिते यांच्या डॉकयार्ड येथील पोलीस वसाहतीतील घरातून सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसह ३० काडतुसे, लाखोंचा किमती ऐवज गेल्या वर्षी चोरीला गेला होता. भायखळा पोलिसांनी चोरांना अटक केली.
२१ एप्रिल २०१८ - चुनाभट्टी येथील पंचशीलनगर परिसरात राहणारे आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले संदीप खाडे (२८) यांच्या घरातून जवळपास ४२ हजार ५०० रुपयांच्या ऐवजासह एटीएम कार्ड चोरीला गेले. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.