मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक दावा केला होता. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत मजार उभारली जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृत मजारवर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केली होती.
सदर मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला होता. जर हा मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र राज्य सरकारने अवघ्या १२ तासांत भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला त्याचसोबत जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास आले आहे. संपूर्ण ही जागा पूर्ववत करण्यात आली आहे.
सदर प्रकरणावर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माहीम तो एक trailer है...पुरे मुबंई में साफ सफाई अभी बाकी है! हे भगवाधारींच सरकार आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच हे फक्त माहिम आणि सांगलीपुरतं मर्यादित नाही. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम सुरु आहे, असा दावा नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
दरम्यान, राज ठाकरेंची रात्री उशिरा सभा संपल्यानंतर त्यानंतर काही जणांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्यामुळे कुणालाही तिथे जाता आले नाही. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रशासनाने मनुष्यबळ वापरून याठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला. सदर कारवाईनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरणामध्ये यश आणि अपयशचा प्रश्न नाहीय. महत्वाचा मुद्दा हा आहे की, मुंबईमध्ये जर अशाप्रकारे अतिक्रमण होत राहिलं, तर या मुंबईची बजबजपुरी व्हायला वेळ लागणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसेच अतिशय विद्युत वेगाने जर प्रशासन कारवाई करत असेल, तर राज्य सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो, असं संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम