नवी मुंबई : महापालिकेचा ‘महासंग्राम’ निर्विघ्नपणे पार पडला, यामध्ये पालिका प्रशासनाचा सिंहाचा वाटा आहे. पारदर्शीपणे निवडणूक यंत्रणा राबविण्यात आली असून, राज्य निवडणूक आयुक्तांनीही कौतुक केले आहे. पूर्ण यंत्रणेवर माहितीपट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, तो राज्यातही आदर्श मॉडेल म्हणून दाखविला जाणार आहे. नवी मुंबईची निवडणूक अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी उपआयुक्त अमरीश पटनिगिरे यांच्यावर निवडणुकीची धुरा सोपविली. नगररचना, शहर अभियंता, विद्युत व जनसंपर्क विभागासही जबाबदारी देण्यात आली. एक प्रभाग पद्धती लागू करून फेरप्रभाग रचना करण्यात आली. पहिल्यांदाच रचनेसाठी गुगल मॅपचा वापर करण्यात आला. माहिती प्रत्येक नागरिकाला उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले. माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली. प्रत्येक दिवशीची माहिती त्याच दिवशी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. जनसंपर्क विभागानेही महत्त्वाची भूमिका बजावली. जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी प्रत्येक माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचविलीप्रशासनाची कसोटी लागली ती मतदार याद्या तयार करताना़ अक्षरश: २४ तास काम करून प्रशासनाने याद्या तयार करून संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या. एमएमएसद्वारे मतदारांना त्यांचा मतदार क्रमांक व इतर सर्व माहिती उपलब्ध करून दिली. मतमोजणीच्या दिवशीही चारही सेंटरवर एलईडी स्क्रीन बसवले होते. शहर अभियंता मोहन डगावकर, सह शहर अभियंता जी. व्ही. राव, प्रशासन उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, नगररचना विभागाने प्रभाग रचनेपासून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यापर्यंतची सर्व भूमिका व्यवस्थित पार पाडली. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पालिका यंत्रणेचे कौतुक केले. पूर्ण यंत्रणेची डॉक्युमेंटरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
‘महा’संग्रामावर साकारणार महितीपट
By admin | Published: April 25, 2015 4:44 AM