मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सचे कवित्व सरून आता प्रतीक्षा आहे, ती आज लागणाऱ्या निकालांची. काय होणार, हा प्रश्न कोट्यवधी मतदारांच्या मनात घोळत आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची हे ठरणार आहे. ईव्हीएममध्ये नेमकं दडलंय काय? सत्ता परिवर्तनाची शक्यता कमी दिसत असली तरी काही नवीन समीकरणे समोर येतील का? अशा चर्चा जोरात आहेत.
शिवसेना : जागा वाढणार?
63 जागा २०१४ला मिळाल्या
‘हीच ती वेळ’ म्हणत मतदारांसमोर गेलेली शिवसेना ही युतीमध्ये लहान भाऊ असली तरी या वेळी जागा वाढण्याची त्यांना आशा आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या रूपाने पहिल्यांदाच ठाकरे घराण्याने थेट निवडणुकीत उमेदवार दिला आहे. पाच वर्षे सत्तेत राहून अनेकदा विरोधकांपेक्षाही टोकदार भूमिका शिवसेनेने घेतली. आपल्या सरकारविरुद्धच आंदोलने केली. शिवसेनेच्या या भूमिकेला मतदार कितपत पसंती देतात ते आज पाहायला मिळेल. पुन्हा युतीची सत्ता आल्यास दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी हे निर्णय कधी अंमलात येणार याची सर्वांना उत्सुकता असेल.
भाजप : आहेत त्या जागा राखणार?
122 जागा २०१४ला मिळाल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपसमोर गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. युती केल्याने १६४ जागा मिळाल्या असताना हे आव्हान भाजप पेलेल का, याचा फैसला आज होईल. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. ‘मी पुन्हा येईनच’ असा निर्धार त्यांनी सातत्याने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता. कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा त्यांच्या प्रचारात ऐरणीवर होता. फडणवीस यांनी विकासाचा अजेंडा मांडला. ‘दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र’ हे सूत्र याहीवेळी कायम राहील का, याविषयी कमालीची उत्कंठा आहे.
राष्ट्रवादी : घेईल भरारी?
41 जागा २०१४ ला मिळाल्या
वयाच्या ऐंशीव्या वर्षी पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे प्रचाराचा धडाका लावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे निवडणूक अंगावर घेतली. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्यावरील ईडीच्या कारवाईने वातावरण ढवळून निघाले. भर पावसातील त्यांची सभा आणि ‘ईडीला येडी करेन’ अशा वाक्यांनी त्यांनी ‘टायगर जिंदा है’चा प्रत्यय दिला. कुटुंबातील वादळ शमविण्यात यश मिळविले आणि त्याचवेळी युतीसमोर आव्हान उभे केले.
काँग्रेस : पुन्हा येईल का राज्य?
42 जागा २०१४ ला मिळाल्या
गतवैभव परत मिळविण्याची आशा बाळगणारी काँग्रेस कोण्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली लढली नाही. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावली. राहुल गांधींच्या तीन सभा वगळता गांधी घराणे आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी प्रचाराला पाठ दाखविली. तोंडदेखल्यापुरते काही नेते आले; पण संघटित प्रचाराचा अभाव दिसला. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसचा किल्ला शर्थीने लढविला. काँग्रेसला जे काही यश मिळेल, त्याचा आधार तेच असतील.
मनसे : सभांची गर्दी मतेही देईल का?
01 जागा २०१४ ला मिळाली
‘मला विरोधी पक्षाची भूमिका द्या,’ असे प्रचारात सांगणारा पहिला नेता म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नोंद झाली. मनसे स्वबळावर लढणार अशी घोषणा त्यांनी ऐनवेळी केली, त्यामुळे तयारीला कमी वेळ मिळाला. लोकसभेप्रमाणे सभा गाजल्या नाहीत. पण प्रतिसाद चांगलाच मिळाला. सभांमधील ही गर्दी निवडणुकीत यश देणार का ते पाहायचे!
वंचित : पुन्हा जादू चालेल का?
01 जागा २०१४ ला मिळाली
लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी युती व आघाडीला ताकद दाखवून दिली. वंचितांची मोट बांधणाऱ्या या आघाडीची जादू लोकसभेसारखीच चालली तर त्यांचे काही चेहरे विधानसभेत दिसतील.