Join us

माहुल : ३ हजार ३४५ कुटूंबे घरांच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 2:54 PM

प्रकल्पबाधितांचा लढा अजुनही सुरुच

माहुल : ३ हजार ३४५ कुटूंबे घरांच्या प्रतीक्षेत

मुंबई : माहुल येथील प्रदूषणपासून मुक्तता व्हावी म्हणून माहुल येथील प्रकल्पबाधितांचा लढा अजुनही सुरुच असून, आजही ३ हजार ३४५ कुटूंबे घरांच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती माहुल आंदोलकांनी दिली. तर नुकतेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोड यांच्यासमवेत माहुल येथील प्रदूषणाबाबत आढावा बैठक घेतली असून, माहुल विषयात तोडगा काढणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी योग्य ती कार्यवाही सुरु आहे, असे आदित्य यांनी बैठकीत नमुद केले.

कोरोनाला हरविताना लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी सरकारकडून गोराईला ३०० घरे देण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात २८८ घरे मिळाली. गोराई येथे १५५ प्रकल्प बाधित स्थलांतरित होत आहेत. तर मालाड येथे एसआरएकडुन ५६८ देण्यात आली आहेत. मात्र याचा ताबा देण्याबाबत आजही प्रक्रिया सुरु झालेली नाही. माहुल म्हाडा वसाहतीमध्ये पुनर्वसनासाठी १७ हजार घरे बांधली आहेत. ७२ इमारती आहेत. येथे साडे पाच हजार कुटूंब प्रकल्पबाधितांना स्थलांतरित करण्यात आले. वास्तविक येथे साडे तीन हजार कुटूंंब आली. १५५ कुटूंबांचे पुनर्वसन गोराईला झाले आहे. त्यामुळे ३ हजार ३४५ कुटूंबे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत, असे आंदोलक नंदू शिंदे यांनी सांगितले. या कुटूंबांचे सायनपासून ठाण्यापर्यंत पुनर्वसन करावे, असे आंदोकांचे म्हणणे आहे. कारण या कुटूंबांच्या नोक-या, मुलांच्या शाळा या पट्ट्यात आहेत.

टॅग्स :प्रदूषणमुंबईमुंबई महानगरपालिकाम्हाडासरकार