Join us

माहुली व भंडारदुर्ग संवर्धन मोहीम

By admin | Published: January 14, 2017 7:17 AM

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सह्याद्री प्रतिष्ठानने आसनगाव येथील माहुली व भंडारदुर्ग किल्ल्यांच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई : मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सह्याद्री प्रतिष्ठानने आसनगाव येथील माहुली व भंडारदुर्ग किल्ल्यांच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. प्रतिष्ठानतर्फे १४ व १५ जानेवारी या दोन दिवसांत किल्ल्यांवर साफसफाई आणि दिशादर्शक बाण लावण्याचे काम करण्यात येणार आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील हे दोन महत्त्वाचे किल्ले मानले जातात. १४ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता किल्ल्याच्या पायथ्यापासून मोहिमेला सुरुवात होईल. रात्री ९.३० वाजता गड चढाईला सुरुवात होणार असून, रात्री १२ वाजता भंडारदुर्गवर मुक्काम केला जाईल. १५ जानेवारीच्या पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाण्याची टाके व गुहेजवळील प्लॅस्टिकचा कचरा व काचेचे तुकडे गोळा केले जातील. तर दुपारी १ वाजता गड उतरण्यास सुरुवात होईल. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत जागोजागी वाटेवर दिशादर्शक बाण लावण्यात येतील. गडावर असलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल. त्यानंतर गडपूजन करून ध्वजवंदना व मंदिराची पूजा केली जाईल.ही मोहीम नि:शुल्क असून, मोहिमेत दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन सामील होता येईल. मोहिमेत सामील होणाऱ्या दुर्गसंवर्धकांनी सोबत एक जोड कपडे, दोन लीटर पाणी, सुके खाद्यपदार्थ (जेवणाचा डबा), टोपी, आजार असल्यास आवश्यक औषधे, ट्रेकिंग बूट, ताट, वाटी, पाण्याचा पेला, विजेरी (टॉर्च) इत्यादी सामान बाळगावे. थंडीचे दिवस असल्याने अंथरूण-पांघरूण व गरम कपडे (स्वेटर) सोबत आणावेत. गडावर कोणत्याही अवघड जागी अतिउत्साही होऊन फोटो काढू नये. १५जानेवारी रोजी सकाळची न्याहारी व जेवण प्रतिष्ठानकडून देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)