Join us

काँग्रेसविरोधामुळे माईंना राज्यसभा मिळाली नाही, रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 9:06 AM

माईंसाहेबांना राज्यसभा मिळावी म्हणून तेव्हा शरद पवार यांच्याकडे मी प्रस्ताव ठेवला होता, आठवले यांचं वक्तव्य.

मुंबई : माईंसाहेबांना राज्यसभा मिळावी म्हणून तेव्हा शरद पवार यांच्याकडे मी प्रस्ताव ठेवला होता. मात्र, काँग्रेसविरोधी प्रतिक्रिया दिल्यामुळे माई आंबेडकरांना राज्यसभा मिळाली नाही, अशी खंत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केली. 

पॅंथरने माई आंबेडकरांवर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांना पुन्हा जनमानसात आणले. एकत्र दौरे केले. बाबासाहेबांनंतर आंबेडकर कुटुंबीयांकडून माईंची दखल घेतली गेली नाही. मात्र माई आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर आंबेडकर कुटुंबीयांकडून हक्क दाखविण्यात आला होता. त्यांना अखेरपर्यंत राज्यसभा मिळाली नाही. तिरुपतीची लोकसभेची जागा माई आंबेडकरांना सोडली होती. त्यांनी ती लढली नाही. त्यानंतर राज्यसभेसाठी प्रस्ताव होता. माईंचा परखड सभाव होता. त्यांनी काँग्रेसबाबत विरोधी प्रतिक्रिया दिल्या. त्याची चर्चा झाली. माईंना अखेरपर्यंत राज्यसभा मिळाली नाही, असेही आठवले म्हणाले.

पँथर्स आणि माई यांच्यातील माय लेकरांच्या नात्याची बुज राखणारा डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्यावरील ‘सूर्यप्रभा’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झाले. या  स्मृतिग्रंथाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी केले आहे. यावेळी ज्येष्ठ संशोधक विजय सुरवाडे, राजर्षी शाहू महाराज प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य रमेश जाधव, लेखिका वाल्मीका एलिजे अहिरे, माजी पोलिस उपायुक्त  सुरेश जाधव यांनी पुस्तकाबाबत विचार व्यक्त केले. 

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी १९८० सालात म्हणजे तब्बल ४३ वर्षांपूर्वी दिल्लीत भारतीय दलित पँथरच्या राष्ट्रीय अधिवेशनात इंग्रजीतून दीर्घ भाषण केले होते. ते ऐतिहासिक आणि विचार प्रवर्तक भाषण पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात या ग्रंथातून वाचकांना पहिल्यांदाच मराठीत वाचायला मिळणार आहे. ‘पुस्तक मार्के’तर्फे प्रकाशन आणि वितरण या ग्रंथाचे होत आहे. 

टॅग्स :रामदास आठवलेकाँग्रेस