अंध तरुणीचा विनयभंग
By admin | Published: December 24, 2015 01:53 AM2015-12-24T01:53:47+5:302015-12-24T01:53:47+5:30
लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित झाला आहे. एका अंध तरुणीचा विनयभंग करण्यात आला आणि हा प्रकार घडत असतानाही अन्य सहप्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली.
मुंबई : लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित झाला आहे. एका अंध तरुणीचा विनयभंग करण्यात आला आणि हा प्रकार घडत असतानाही अन्य सहप्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-बोरीवली लोकलमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
मंगळवारी दुपारी सव्वाएकच्या एका २३ वर्षीय तरुणीने अंधेरीला जाणारी लोकल चर्चगेट स्थानकातून पकडली. चर्चगेटमधील एका अंध महिलांच्या हॉस्टेलमध्ये राहणारी ही तरुणी अंधेरी येथे कामाला जात होती. अंधेरी स्थानकात ही लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जात असल्याने आणि त्यामुळे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी बराच खटाटोप करावा लागत असल्याने अंध तरुणीने खार स्थानकात उतरून बोरीवली लोकल पकडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खार स्थानकात उतरल्यानंतर एक तरुण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. या तरुणाने अपंगांच्या डब्यात सोडतो, असे सांगून तिला मालडब्यात नेले आणि तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी या तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. पण मदतीसाठी याचना करूनही कोणत्याही सहप्रवाशाकडून मदत देण्यात आली नाही. यातून तरुणीने स्वत:ची कशीबशी सुटका केली आणि सांताक्रूझ स्थानकात उतरली. यात मालडब्यातून उतरलेल्या काही प्रवाशांनी तिला रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या तरुणीने वांद्रे रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी कलम ३५४ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)