मुंबई : बोरीवली येथील महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिराच्या स्वच्छतेचे कंत्राट खासगी कंपनीला देण्याचा प्रस्ताव, सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केला. यामुळे या नाट्यमंदिरात काम करणाऱ्या १२० कामगारांची नोकरी अडचणीत आली आहे. विरोधकांनी यावर आक्षेप घेतला असताना, सत्ताधाऱ्यांनी मतदान घेऊन हा प्रस्ताव मंजूर केला.प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर संकुलातील साफसफाईच्या कामासाठी खासगी ठेकेदार नेमण्याचा प्रस्ताव, स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजुरीसाठी मांडण्यात आला. मात्र, या ठिकाणी गेली १२ वर्षे काम करत असलेल्या १२० मराठी कामगारांना घरी बसवून खासगी कामगार का नियुक्त केले जात आहेत? असा जाब विरोधकांनी विचारला. मात्र, पालिका धोरणानुसार या पूर्वीही खासगीकरणाच्या माध्यमातून असे निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.प्रशासनाने धोरणात्मक निर्णयाची सबब देत, हा प्रस्ताव पुढे सरकवला. मात्र, यावर प्रशासनाची री ओढत सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावावर मतदान घेतले. त्यामुळे बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर झाला. (प्रतिनिधी)
मराठी कामगारांच्या नोकरीवर गदा
By admin | Published: November 16, 2016 5:53 AM