मुंबई : आपल्यासोबत विवाह करण्यासाठी एका तरुणाकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून सतरा वर्षांच्या युवतीने पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव (पू.) येथील झोपडपट्टीत घडली. या प्रकरणी राजू हरिजन (२५) याला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, राजूनेच आपल्या मुलीवर बलात्कार करून तिला पेटविल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कारही केलेले नव्हते. पीडित मुलगी मेघा (नावात बदल) हिचे कुटुंब गोरेगाव पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टीत राहते. याच परिसरात राहणारा राजू हरिजन आपल्याशी लग्न करण्यासाठी तिचा पिच्छा पुरवीत होता. मात्र मेघाच्या घरच्यांनी त्याला नकार दिल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये नेहमी वाद होत होते. त्यामुळे या त्रासाला कंटाळून ३० डिसेंबरला मेघाने रॉकेल ओतून पेटवून घेतले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तिला बोरीवलीच्या भगवती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हरिजनला अटक केली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत गुरव यांनी सांगितले. दरम्यान, घटनेच्या दिवशी राजूने घराच्या मागील दाराने येऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिला पेटविल्याचे मेघाच्या कुटुंबीयाचे म्हणणे आहे. जोपर्यंत बलात्कार व हत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास तिच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे.
गोरेगाव येथे युवतीची आत्महत्या
By admin | Published: January 06, 2016 1:16 AM