Join us

मोलकरणीने केला मालकाचा विश्वासघात

By admin | Published: March 26, 2016 2:24 AM

मोलकरणीला मुलीसमान समजून लाखोंची मालमत्ता तिच्या नावावर करण्याचा निर्णय एका जोडप्याने घेतला. त्याच मोलकरणीने पतीसोबत मिळून या घरावर डल्ला मारला आणि लाखोंचा ऐवज

मुंबई : मोलकरणीला मुलीसमान समजून लाखोंची मालमत्ता तिच्या नावावर करण्याचा निर्णय एका जोडप्याने घेतला. त्याच मोलकरणीने पतीसोबत मिळून या घरावर डल्ला मारला आणि लाखोंचा ऐवज घेऊन ती फरार झाली. या प्रकरणी मालवणी पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बंगळुरूमधून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.मालवणी चर्च परिसरात राहणाऱ्या मंजुळा भंडारी (५५) यांच्या घरी १३ मार्च रोजी हा प्रकार घडला. भंडारी यांचे पती पायाने अधू असल्याने त्यांना नीट चालता येत नाही. तसेच त्यांचा मुलगादेखील त्यांची देखरेख करत नसल्याने त्यांनी तीन महिन्यांपूर्वी रिया शेख नामक एका महिलेला घरी मोलकरीण म्हणून कामास ठेवले होते. रिया ही मूळची बंगळुरूची राहणारी असून तिने आसिफ शेख नावाच्या तरुणाशी लग्न केले आणि मुंबईला पळून आली. कामाच्या शोधात आलेल्या शेखला भंडारी यांनी आसरा दिला. तीन महिन्यांत शेखने भंडारी यांचा विश्वास संपादन केला. भंडारी आणि त्यांचे पती शेखवर डोळे झाकून विश्वास ठेवू लागले. दोघांनी चक्क त्यांची सर्व मालमत्ता शेखच्या नावावर करण्याचे ठरविले. शेखने असिफसोबत मिळून भंडारी यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा पाच लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या मालवणी पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला असता, ते दोघे बंगळुरूला पसार झाल्याचे एका ट्रॅव्हल एजंटकडून त्यांना समजले. त्यानुसार मालवणी पोलिसांचे एक पथक बंगळुरूला रवाना झाले आणि त्यांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. चोरीला गेलेला ऐवजही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्यांनी असा काही प्रकार अन्य ठिकाणीदेखील केला आहे का, याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)