- मोलकरणीला महिन्याला चार ते पाच हजार पगार
- अनेक मोलकरणी या चार ते पाच घरांचे काम करत आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या आठवड्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घरकाम करणाऱ्या मोलकरणींवर मोठे संकट आले आहे. अनेक मोलकरणींना अनेक घरांचे दरवाजे बंद होत आहेत. परिणामी कुटुंबाचा गाडा कसा चालणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
कोरोनाला थोपविण्यासाठी सर्वच स्तरातून उपाययोजना केल्या जात आहेत. यात प्रमुख उपाययोजना म्हणजे स्वच्छता राखणे आणि सोशल डिस्टन्सिंग होय. याचे तंतोतंत पालन होत असले तरी घरकामासाठी घरी येत असलेल्या मोलकरणींना घरांमध्ये येण्यास बहुतांश सोसायट्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मज्जाव केला आहे. मात्र यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील तब्बल ८ लाख मोलकरणींवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी त्यांना त्यांच्या हक्काचे वेतन देण्यात यावे, असे म्हणणे मांडण्यात येत आहेत.
सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेचे अध्यक्ष सुभाष मराठे निमगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात ८ लाख मोलकरणी आहेत. राज्यात ३५ ते ४० लाख मोलकरणी आहेत. यातील बहुतांशी मोलकरणी या घरी बसल्या आहेत. एका मोलकरणीला महिन्याला चार ते पाच हजार पगार आहे. काहींना सात ते आठ हजार पगार आहे. अनेक मोलकरणी या चार ते पाच घरांचे काम करत आहेत. एखाद्या मालकास घरी काम करण्यास मोलकरणीस बोलाविण्याची इच्छा असली तरी केवळ सोसायट्यांनी घातलेल्या निर्बांधामुळे मोलकरणींना घरकामास प्रवेश मिळत नाही.
घरकाम करण्यास बाईमाणूस नसतो
ज्येष्ठ नागरिकांच्या घरी कोणी तरुण नसते किंवा काही कुटुंब अशी असतात त्यांच्या घरी घरकाम करण्यास बाईमाणूस नसतो. अशावेळी अशा कुटुंबांना मोलकरणींना घरे बोलविणे भाग असते. मात्र आता सोसायट्यांनी घातलेल्या निर्बांधामुळे मोलकरणींना सोसायटीमध्ये प्रवेश मिळत नाही.
प्रवेशाबाबत लेखी आदेश द्या
मुंबईतल्या सोसायट्यांनी मोलकरणी, कामगार किंवा तत्सम सेवा देत असलेल्या नागरिकांना सोसायटीमध्ये प्रवेश दिला पाहिजे. प्रवेश देताना सुरक्षादेखील बाळगली पाहिजे. मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता येथे ३५ हजार सोसायट्या आहेत. ८० लाख रहिवासी यामध्ये राहत आहेत. सरकारने किंवा महापालिकेने सोसायटीमधील तत्सम सेवा देत असलेल्या कामगारांच्या प्रवेशाबाबत लेखी आदेश दिले पाहिजेत.
सुरक्षा बाळगत प्रवेश दिला पाहिजे
सुरक्षेची काळजी घेत सोसायट्यांनी मोलकरणींना प्रवेश दिला पाहिजे. काही दिवसांपूर्वी पूर्व उपनगरात सोसाट्यांनी मोलकरणींना प्रवेश नाकारल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या. मात्र हे केवळ मोलकरणींपुरते मर्यादित राहत नाही. सोसायटीमध्ये अनेक कामे सुरू असतात. अशा कामांशी, सेवांशी संबंधित कामगारांना सोसायटीमध्ये सुरक्षा बाळगत प्रवेश दिला पाहिजे, असे सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेकडून सांगण्यात आले.
पोट हातावर
मोलकरणींचे पोट हातावर आहे. प्रत्येकाच्या घरी परिस्थिती सारखीच असेल असे नाही. मोलकरणींचे पती हे देखील बिगारी कामगार आहेत. नाका कामगार आहेत. काहींना व्यसने आहेत. लहान मुले आहेत. मुलांचे शिक्षण आहे. घराचा खर्च आहे. संपूर्ण कुटुंब मोलकरणीवर अवलंबून असते. काही घरांकडून मोलकरणींना मदत मिळते. त्यांचे घर त्या मदतीवर अवलंबून असते.