Join us

धुक्यामुळे मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीला ‘लेटमार्क’; एक तासापेक्षा जास्त विलंबाने धावल्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 10:27 AM

गेल्या काही दिवसांपासून धुक्यामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसची वाहतुकीला लेटमार्क लागत आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून धुक्यामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसची वाहतुकीला लेटमार्क लागत आहे. शुक्रवारी पहाटे कसारा-कर्जत परिसरात धुक्यामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने तर मेल-एक्स्प्रेस एक तासापेक्षा जास्त विलंबाने धावत होत्या. वसई-विरार भागातील धुक्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल देखील उशिराने धावत होत्या. 

धुक्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीला लेटमार्क लागू नये यासाठी मध्य रेल्वेने धुके सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात केली. परंतु त्याच्या रेल्वेला फायदा होताना दिसून येत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून दाट धुक्यामुळे अनेक मेल- एक्स्प्रेस गाड्यांना फटका बसतो आहे. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने त्याचा परिणाम थेट लोकल सेवेवर होताना दिसून येत आहे. शुक्रवारी पहाटे कसारा-कर्जत परिसरात धुक्याची चादर पसरल्याने लांब पल्याच्या मेल -एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळापेक्षाही विलंबाने धावत होत्या.

 या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळविण्यात आल्याने अप जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला होता. सकाळपासून मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे, मेल-एक्स्प्रेस एक तासापेक्षा जास्त विलंबाने धावत होत्या. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारपर्यंत चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि सीएसएमटी, दादर, कुर्ला, एलटीटीकडे येणाऱ्या लोकल विलंबाने धावत असल्याने स्थानक आणि लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. लोकल वेळापत्रकानुसार चालविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिवसभरात काही लोकल रद्द केल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वे