मुंबई-पुणे मार्गावरील मेल, एक्स्प्रेस ९ ऑगस्टपर्यंत रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:50 AM2019-07-25T02:50:49+5:302019-07-25T02:51:26+5:30
रेल्वे प्रशासन; दरड कोसळण्याच्या घटनांसह पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी घेतला निर्णय
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दक्षिण घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने, जून महिन्यांपासून येथील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे येथील दरड कोसळण्याच्या परिसरातील पायाभूत सुविधाची उभारणी करण्यासाठी रेल्वे मार्ग बंद करण्यात येणार आहे. परिणामी, मुंबई ते पुणे जाणारी डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस ९ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
दक्षिण घाट परिसरात जून महिन्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने, मध्य रेल्वेची सेवा कोलमडली. यामुळे कर्जत ते लोणावळा घाट भागात दुरुस्ती करण्यासाठी ९ ऑगस्टपर्यंत मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई मार्गावरील मेल, एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत, तर काही मेल, एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
मेल, एक्स्प्रेसच्या मार्गात बदल
मुंबई ते कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत मुंबई ते पुणेदरम्यान धावणार नाही. कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत पुणे ते मुंबईदरम्यान रद्द करण्यात आली आहे. हुबळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २५ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत पुणे ते मुंबईदरम्यान, तर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ते हुबळी २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत मुंबई ते पुणेदरम्यान रद्द केली आहे.
याचप्रमाणे, कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्स्प्रेस २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत पुणे ते मुंबईदरम्यान धावणार नाही, तर मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत मुंबई ते पुणेदरम्यान रद्द करण्यात आली आहे. नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस २५ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत पुणे ते पनवेलदरम्यान, तसेच पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत पनवेल ते पुणेदरम्यान रद्द करण्यात आली आहे.
या मेल, एक्स्प्रेस रद्द
पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत रद्द केली आहे.
पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत रद्द.
मुंबई-गदग एक्स्प्रेस २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत धावणार नाही.
गदग-मुंबई एक्स्प्रेस २७ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत रद्द.
पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत धावणार नाही.
सुट्टीकालीन विशेष मेल, एक्स्प्रेसवरही परिणाम
नांदेड ते पनवेल सुट्टीकालीन विशेष मेल, एक्स्प्रेस २७ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत पुणे ते पनवेलदरम्यान, तर पनवेल ते नांदेड सुट्टीकालीन विशेष मेल, एक्स्प्रेस २८ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत पनवेल ते पुणे दरम्यान रद्द केली आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत दौंड-मनमाड चालविण्यात येईल.