- खलील गिरकरमुंबई : अनेक आव्हानांना सामोरे जात भारतीय टपाल विभाग मार्गक्रमण करत आहे. पोस्टमनच्या जबाबदाऱ्यांत आमूलाग्र बदल झाले आहेत. केवळ टपाल बटवडा करण्याचे काम करणा-या पोस्टमनच्या हातात आता हँड हेल्ड मशिन, मोबाइल देऊन पेमेंट बँकेपर्यंतचे काम आले आहे. या सर्व माध्यमातून टपाल खात्याची प्रगतीच्या मार्गावर घोडदौड सुरू असल्याचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी सांगितले.
जागतिक टपाल दिनानिमित्ताने मंगळवारपासून टपाल सप्ताह सुरू होत आहे. त्या निमित्ताने माहिती देताना अग्रवाल म्हणाले की, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, आधार केंद्रे, पासपोर्ट सेवा केंद्रे या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना विभागाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. माय स्टॅम्पसारख्या योजनांच्या माध्यमातून तरुणाई व ज्येष्ठ नागरिकांसहित सर्वांमध्ये टपाल खात्याविषयी आत्मीयता वाढविण्यात यश आले आहे. नागरिकांची पत्रे पाठविण्याची सवय कमी झाली असली, तरी कॉर्पोरेट व सरकारी कामांसाठी रजिस्टर्ड पत्रे पाठविणे बंधनकारक असल्याने काम वाढले आहे.
टपाल विभागाचे संगणकीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील ७,१५१ शाखा कार्यालयांना याद्वारे जोडण्यात आले. सेव्हिंग बँक विभागात जूनपर्यंत महाराष्ट्र सर्कलमध्ये ६ लाख ९६ हजार ४७ खाती, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ३०,१८० खाती, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेमध्ये १ लाख ७१ हजार ३४ खाती, तर प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेमध्ये ७,६७१ खाती उघडली आहेत. स्पीडपोस्टच्या महसुलात गत वर्षी १४ टक्के, तर बिझनेस पोस्टच्या महसुलात ११ टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.