Join us  

...तर मुंबईत शिवसेनेची ताकद वाढेल; मिलिंद देवरांच्या प्रवेशाबाबत उदय सामंताचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 3:50 PM

ते खासदार असताना त्यांनी संसदेत मुंबईकरांचे अनेक प्रश्न मांडले आहेत असं कौतुक सामंत यांनी देवरा यांचे केले.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यात काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात मिलिंद देवरा हे लोकांमध्ये मिसळणारे नेतृत्व असून त्यांना मुरली देवरा यांचा वारसा लाभलेला आहे. मिलिंद देवरा हे अभ्यासू नेतृत्व आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास नक्कीच मुंबईत पक्षाची ताकद वाढेल आणि चांगला चेहरा पक्षाला मिळेल असे सूतोवाच मंत्री उदय सामंत यांनी केले आहेत. 

याबाबत मंत्री उदय सामंत म्हणाले की, मिलिंद देवरा लोकांमध्ये जाऊन काम करणारे मुंबईचे नेतृत्व आहे. मुंबईतील अनेक आमदार-माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतायेत. एकनाथ शिंदे ज्याप्रकारे अहोरात्र लोकांची सेवा करतात. त्यात मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेतृत्वाची शिंदेंना साथ मिळाली तर निश्चित मुंबईत शिवसेना चांगल्यारितीने वाढू शकेल. त्यामुळे जर त्यांच्या मनात पक्षबदल करण्याचा विचार असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा अशी विनंतीही त्यांनी केली. 

तसेच नाराजी कुठे आहे माहिती नाही. परंतु मिलिंद देवरा हे अभ्यासू नेतृत्व आहे. ते खासदार असताना त्यांनी संसदेत मुंबईकरांचे अनेक प्रश्न मांडले आहेत. मिलिंद देवरा यांना मुरली देवरा यांचा आशीर्वाद आहे. जर असा चेहरा मुंबईत मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढेल आणि मुंबईत आम्हालाही चांगला चेहरा मिळेल असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मी जेव्हा सांगितले उद्धव ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येतील त्याच्या पुढच्या १० दिवसांत नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, तुकाराम काते तसेच अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला. त्यामुळे माझ्याकडे जी माहिती असते त्यात तथ्य असते. त्यामुळे रोज सकाळी टाहो फोडतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ज्या आघाडीला पंतप्रधानपदाचा चेहराच नाही. महायुतीचा पंतप्रधानपदाचा चेहरा नरेंद्र मोदी आहेत. तसा विरोधी पक्षाने त्यांच्याकडील चेहरा सांगावा. इंडिया आघाडीचे नेते सैरभैर झाले आहेत अशी टीकाही उदय सामंत यांनी विरोधकांवर केली. 

टॅग्स :शिवसेनाकाँग्रेस