दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी निसटला?
By admin | Published: May 26, 2016 12:39 AM2016-05-26T00:39:30+5:302016-05-26T00:39:30+5:30
कांदिवलीतील हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरिश भाम्बानी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. कांदिवली पोलिसांनी आठवडाभरापूर्वी हेमाचे
मुंबई : कांदिवलीतील हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरिश भाम्बानी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. कांदिवली पोलिसांनी आठवडाभरापूर्वी हेमाचे पती चिंतन उपाध्याय आणि अन्य चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. तथापि, या हत्याकांडातील मुख्य आरोपी विद्याधर राजभर मात्र अजूनही फरार आहे. महिनाभरापूर्वी राजभर आमच्या हाती लागता लागता थोडक्यात निसटला, असे गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
हे हत्याकांड घडल्यापासून राजभर फरार आहे. त्याच्या मोबाईल फोनचा ठावठिकाणा गुवाहटीत लागल्यानंतर तो रेल्वे पाकशाळेत काम करीत होता काय? याबाबतही गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास केला. या दुहेरी हत्याकांडाचा तपास आता घाटकोपरच्या गुन्हे शाखेच्या युनिट ७ कडे सोपविण्यात आला आहे. या हत्याकांडप्रकरणी गुन्हे शाखेतील युनिट ११ समांतर तपास करीत होते. राजभरचा कसून शोध घेऊनही तो हाती लागलेला नाही. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्ंयासाठी राजभर सातत्याने ठिकाणे बदलत असनू नवीन सीम कार्डचा वापर करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मार्चमध्ये तो कोईम्बुतरातील एका दुकानात आपला मोबाईल दुरुस्तीसाठी गेला होता. मला एक फोन करु द्या, अशी विनंती त्याने दुकानदाराला करुन एका दूरच्या नातेवाईकाला फोन केला. परंतु, त्याने कोठून बोलत आहोत, हे मात्र सांगितले नाही, असे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या नातेवाईकाने राजभरने ज्या मोबाईलवरून फोन केला, तो नंबर दिल्यानंतर पोलिसांचे एक पथक कोईम्बतूरला रवाना झाले. मोबाईल दुरुस्तीच्या दुकानदाराने राजभरचे छायाचित्र ओळखले. परंतु, लागलीच दुसऱ्या दिवशी दुरुस्त केलेला आपला मोबाईल घेऊन गेल्याचे दुकानदाराने सांगितले. अशा रितीने तो हाती लागता लागता थोडक्यात निसटला.