वांद्र्याच्या रिंगणात प्रमुख उमेदवार राहणारच
By admin | Published: March 27, 2015 01:29 AM2015-03-27T01:29:11+5:302015-03-27T01:29:11+5:30
वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस असल्याने रिंगणात किती उमेदवार त्याचा फैसला उद्या होईल.
मुंबई : वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस असल्याने रिंगणात किती उमेदवार त्याचा फैसला उद्या होईल. शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत, काँग्रेसचे नारायण राणे व एमआयएमचे राजा सिराज रेहबार खान यांच्यासह अन्य १६ व्यक्तींनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या संपते. शिवसेनेच्या सावंत यांनी आपला प्रचार सुरु केला आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शिवसेनेचा प्रचार करण्याचा आदेश दिला तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सावंत यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन झाले.
नारायण राणे यांनीही प्रचार सुरु केला आहे. मात्र त्यांच्या प्रचाराकरिता तळकोकणातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. चेंबूर येथील राणे यांचे कार्यकर्तेही प्रचारात सामील झाले आहेत.
(विशेष प्रतिनिधी)
उद्धव अखेरच्या टप्प्यात प्रचारात उतरणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अखेरच्या टप्प्यात प्रचारात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. प्रचार संपत असताना ठाकरे एक-दोन सभा घेतील, असे शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितले.