Join us

दागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 6:03 AM

काजल ज्वेलर्स लूट प्रकरण, झटपट श्रीमंतीचा हव्यास बेतला जिवावर

मुंबई : झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने लुटीचा डाव आखला. कमिशनचे आमिष दाखवून आणखी दोघांची मदत घेतली. ठरल्याप्रमाणे दुकानातील ४ किलो सोन्यावर हात साफ केला. एक हिस्सा अन्य साथीदारांना देत त्यांना राजस्थानला रवाना केले. उर्वरित दागिन्यांसह मुख्य सूत्रधाराने मित्राचे घर गाठले. मात्र दागिने पाहून मित्राची नियत फिरली. त्याने अन्य दोघांच्या मदतीने मुख्य सूत्रधाराचाच काटा काढल्याची घटना काजल ज्वेलर्सच्या लूट प्रकरणातून उघड झाली आहे. या मारेकऱ्यांना शुक्रवारी वडाळा टी.टी. पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

वडाळा येथील म्हाडा कॉलनीतील काजल ज्वेलर्सच्या दुकानात ११ आॅक्टोबरला चोरी करण्यात आली. यातील मुख्य सूत्रधार नारायण चंपालाल गुर्जर हा अ‍ॅण्टॉप हिल येथील एका मिठाईच्या दुकानात नोकरी करायचा. काही महिन्यांपूर्वीच त्याची काजल ज्वेलर्समध्ये काम करणाºया नारायण बारुजीशी ओळख झाली. बारुजीकडून त्याला दुकानातील दागिन्यांची माहिती मिळाली. यातूनच त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरीचा डाव आखला. त्याने बारुजीला जास्तीच्या कमिशनचे आमिष दाखवले. बारुजीही तयार झाला. त्याने दुकान मालकाचा दिनक्रम त्याला सांगितला. त्याच्या मदतीने दुकानाची बनावट चावी बनवून घेतली. त्यानुसार मित्र सुरेशला हाताशी घेऊन त्याने ११ आॅक्टोबरला मालक जेवायला जाताच, दुकानातील दागिन्यांवर हात साफ केला. तेथून त्यांनी भार्इंदर स्थानक गाठले. तेथे दागिन्यांचे दोन भाग केले. एक हिस्सा स्वत:कडे ठेवून अन्य दोघांना राजस्थानला जाण्यास सांगितले.

तोपर्यंत वडाळा टी.टी. पोलिसांकडून तपास सुरू झाला होता. तपासात नारायण हा राजस्थानच्या बागोर येथे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राजस्थान पोलिसांच्या मदतीने सापळा रचून शिताफीने जंगलात लपून बसलेल्या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळील १ किलो २०० ग्रॅम सोने जप्त केले.नारायण याने श्रीमंत होण्याचे स्वप्न रंगविले. मदतीसाठी तो मदनलाल नावाच्या मित्राजवळ थांबला होता. नारायणजवळील सोने पाहून मदनलालची नियत फिरली. नारायण आपल्याकडे आला हे कुणाला माहिती नाही. त्यात दागिने हाती लागले तर करोडपती होऊ या उद्देशाने त्याने आपला भाऊ हरलाल व मित्र शुभम याला सांगितले. तिघांनीही मुख्य सूत्रधार नारायणची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. नारायणची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना ते नाकाबंदी दरम्यान माणिकपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १ किलो ५६० ग्रॅम सोने जप्त केले. शुक्रवारी वडाळा टी.टी. पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

टॅग्स :दरोडा