महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या प्रमुख मागण्या मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 04:13 PM2018-03-05T16:13:49+5:302018-03-05T16:13:49+5:30
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिका-यांसोबत त्यांच्या विविध मागण्यांसोबत चर्चा सुरु होती.
मुंबई – महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिका-यांसोबत त्यांच्या विविध मागण्यांसोबत चर्चा सुरु होती. यापूर्वीच त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या चर्चेअंती अन्य काही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित मागण्या या अर्थ विभागाशी संबंधित असल्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन त्या मागण्या सकारात्मकरित्या सोडविण्यात येतील, तसेच अन्य काही मागण्या विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर अर्थमंत्र्यासमवेत बैठका घेऊन त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.
महासंघाच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या असून आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीचे बहिष्कार आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही शिक्षणमंत्री तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केले.
विधीमंडळात प्रसिध्दीमाध्यांशी बोलताना शिक्षण मंत्री तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या खालील मागण्या मान्य करण्यात आल्या. याप्रसंगी राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार ना.गो.गाणार, महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख तसेच सरचिटणीस, संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.