मुंबई : महापालिका आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चेंबूरमधील यशवंत नगरातील मुख्य नाल्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. गेल्या दहा वर्षांत या ठिकाणाची सफाईच करण्यात आलेली नाही. त्यामुळे या नाल्यातील सांडपाणी संपूर्ण परिसरात वाहत असून या भागात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. दरम्यान, दोन दिवसांत या ठिकाणी सफाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूरच्या सर्व्हिस रोडलगत हा नाला असून याच रोडलगत पोस्टल कॉलनी आणि यशवंत नगर हा परिसर आहे. मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडच्या मधोमध हा नाला असल्याने तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये आहे. दहा वर्षांपूर्वी हा नाला खुला होता. मात्र बांधकाम विभागाने खुल्या असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकून तो बंद केला. मात्र त्यानंतर एकदाही हा नाला पावसाळ्यापूर्वी अथवा त्यानंतर साफ करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दहा वर्षांत या नाल्यात मोठ्या प्रमाणात माती गेल्याने तो पूर्णपणे तुंबलेला आहे. परिणामी पावसाळ्यात तर या ठिकाणी पाणी वाहण्यासाठी जागाच नसल्याने सर्व्हिस रोड पूर्णपणे पाण्याखाली जातो. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर पूर्णपणे चिखल साचलेला असतो. महापालिकेनेही आपले काम कमी करण्यासाठी परिसरातून येणाऱ्या सर्व गटारांचे सांडपाणी या नाल्यातच सोडले आहे. मात्र नालाच साफ नसल्याने परिसरातील सांडपाणी नाल्यात न जाता रस्त्यांवरच साचत आहे. मुख्य रस्त्यावरच हे सांडपाणी जमा होत असल्याने रहिवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरले असून याचा त्रास येथील लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत येथील रहिवाशांनी अनेकदा स्थानिक नगरसेविकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अनेकदा तक्रारी करूनही त्या या ठिकाणी एकदाही फिरकल्या नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. मनसेच्या वाहतूक विभागाचे उपाध्यक्ष नितीन नांदगावकर यांना समजताच त्यांनी तत्काळ जेसीबी मशिन आणून काही ठिकाणी सांडपाण्याचा जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र हा नाला दीड ते दोन किलोमीटर लांबीचा असल्याने संपूर्ण नालाच तोडून त्याची सफाई करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसा पत्रव्यवहार त्यांनी पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागासोबत केला आहे. मात्र येत्या दोन दिवसांत या ठिकाणी सफाई न झाल्यास महापालिका अधिकाऱ्यांच्या टेबलावर ही घाण टाकून मनसे आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
चेंबूरमधील मुख्य नाल्याची दहा वर्षांत सफाई नाही
By admin | Published: January 19, 2016 2:45 AM