विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : लोकसभा, विधानसभा आणि मुंबई-ठाणे महापालिकांप्रमाणेच इतर पक्षांत फोडाफोडी करून ताकद वाढवण्याच्या भाजपाच्या मनसुब्यांना भिवंडीत सुरूंग लागल्याने, राष्ट्रवादी-समाजवादी पक्षाची आघाडी वगळता सर्व पक्ष स्वबळ दाखवण्याच्या खुमखुमीत असल्याने भाजपाविरुद्ध सारे हेच येथील प्रचाराचे प्रमुख सूत्र राहिले. त्यामुळे निवडणुकीनंतरच्या सत्ता समीकरणांसाठी राजकीय मित्रांची जुळवाजुळव करत येथील प्रचार पार पडला; पण त्यात ना नेत्यांनी उत्साह दाखवला, ना मतदारांनी.भिवंडीच्या ९० जागांपैकी कोणत्याच पक्षाने सर्व जागी उमेदवार उभे केलेले नाहीत. मुस्लीमबहुल परिसर असल्याने धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे आणि उजवे अशा सर्वांनीच मुस्लीम उमेदवार दिले. जाहीरनामा, वचननामा, घोषणापत्रात त्या समाजाच्या मागण्यांना प्राधान्य देण्यात आले. पण ठोस आश्वासने नसलेली, विकासाची तीच ती जुनी भाषणे सत्ताधाऱ्यांनी दिली आणि विरोधकांनी शेतकरी-कामगार, अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे तुणतुणे वाजवले. निकालाची परंपरा पाहता कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता केला. दुसरीकडे शिवसेना अपेक्षेप्रमाणे स्वबळावर लढली. मनसे आणि एमएमएमने हवी तशी ताकद लावली नाही आणि इतर पक्षांतील बंडखोरांवर भरवसा ठेवून असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने शेवटच्या क्षणी माघार घेतली. शिवसेनेचीच कडवी लढत : निवडणुकीत नेमके काय करणार, याबाबत ताकास तूर लागू न देणाऱ्या शिवसेनेने शांतपणे, पण नियोजनबद्धरीत्या प्रचार केला. भाजपा असो की कोणार्क आघाडी त्यांना कडवी झुंज देणारा पक्ष म्हणून शिवसेनाच चर्चेत राहिली. मुंबई, ठाणे, उल्हासनगरपाठोपाठ भिवंडीतही शिवसेना-भाजपात संघर्ष पाहायला मिळाला.म्हात्रे हत्या आणि मतदारयाद्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांची हत्या आणि प्रमुख हल्लेखोर भाजपाचा पदाधिकारी असल्याने प्रचारात काँग्रेसकडून तो प्रमुख मुद्दा केला जाईल हे अपेक्षित होते. म्हात्रे यांच्या पत्नीला पक्षाने उमेदवारी दिली, हा मुद्दा नंतर उचलला गेला नाही. नवभाजपावाद्यांशी संघर्ष खासदार कपिल पाटील भाजपात आले. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांशी मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांचा सुप्त संघर्ष आहे. त्यातच कोणार्क आघाडीशी भाजपाने समझोता केल्याने त्याला भाजपासोबत संघ कार्यकर्त्यांनी विरोध केला. ही खदखद अजूनही संपलेली नाही.
‘भाजपाविरुद्ध सारे’ हेच प्रचाराचे प्रमुख सूत्र
By admin | Published: May 24, 2017 1:55 AM