लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करून त्यांची परदेशात तस्करी करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार पंजाबमधील असून त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे पथक पंजाबमध्ये गेले आहे. मात्र अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.त्याच्या अटकेने प्रकरणातील महत्त्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या जबरी चोरी-दरोडाविरोधी पथकाने मुंबई विमानतळावरून चार अल्पवयीन मुलांची सुखरूप सुटका केल्यानंतर मानवी तस्करी उघड झाली. पोलिसांनी अस्लम आरिफ फारुकी (३८) या मुख्य सूत्रधारासह १२ जणांना आतापर्यंत अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी प्रत्येकी ४ ते ५ मुलांचे धर्मांतर करून त्यांना विदेशात पाठवल्याचे तपासात समोर आले. मात्र त्यांच्याकडे या मुलांची संपूर्ण माहिती नाही. आरिफकडे सापडलेल्या डायरीत ११० मुलांच्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही मुले नेमकी कुठे आहेत? याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.४० ते ४५ मुलांची विदेशात तस्करी केल्याचे समजते. तर अन्य मुलांच्या तस्करीत कागदोपत्री अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांची देशातच विक्री झाल्याची शक्यता गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात येत आहे. संबंधित मुलांचा शोध सुरू आहे.अमृतसरमधून या मुलांची तस्करी होत आहे. येथील मुख्य दलाल हा मुंबईतील दलालांसोबत संपर्क करून या मुलांना त्यांच्या ताब्यात देत असे. त्याचाच मुलांच्या पालकांसोबत थेट संपर्क होता. पैशांचा व्यवहारदेखील तोच करत असे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींकडे मुलांची नावे आहेत. मात्र त्यांच्याबाबत सविस्तर माहिती नाही.
मानवी तस्करीप्रकरणातील मुख्य सूत्रधार पंजाबमध्ये
By admin | Published: June 20, 2017 2:37 AM