Join us

नागोठणेत मुख्य रस्ता पुन्हा खड्ड्यात

By admin | Published: June 12, 2015 10:45 PM

दरवर्षी न चुकता जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याकडून डागडुजी करण्यात येणारा शहरातील मुख्य रस्ता पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा

नागोठणे : दरवर्षी न चुकता जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याकडून डागडुजी करण्यात येणारा शहरातील मुख्य रस्ता पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा खड्डेमय झाला आहे. या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून दरवर्षी लाखोंचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र तरीही परिस्थिती जैसे थे असल्याने रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत राहण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून बांधकाम खात्याकडे करण्यात आली आहे.मुंबई - गोवा महामार्गावरून पेण फाटा ते शिवाजी चौकमार्गे पुन्हा महामार्गाला जोडणारा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतचा रस्ता रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. रस्त्याची लांबी साधारणत: बाराशे मीटर इतकी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ते मरीआई मंदिरापर्यंतचा रस्ता कायम सुस्थितीत राहत असला, तरी तेथून पुढे शिवाजी चौक ते पेण फाट्यापर्यंतचा हा रस्ता दरवर्षी खड्ड्यांनी व्यापत असतो. या रस्त्यावरून दररोज एस.टी. तसेच खासगी बसेससह हजारो वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचा सोपस्कार दरवर्षी केला जातो. मात्र, काही दिवसांत पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले जाते. याच आठवड्यात पावसाळा चालू होणार असल्याने हे खड्डे पाण्याने भरून त्यातील चिखलमिश्रित पाणी बाजूने जाणाऱ्या वाहनांद्वारे पादचाऱ्यांच्या अंगावर उडण्यास प्रारंभ होणार आहे. येथील जनतेला हे पाणी अंगावर घ्यायची दरवर्षी सवयच झाली असली तरी कायमस्वरूपी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रस्ता तयार करण्याऐवजी उन्हाळ्यात खड्डे भरून फक्त अर्थपूर्ण सोपस्कार उरकण्यातच बांधकाम खात्याला स्वारस्य आहे का, असा त्रस्त नागरिकांचा सवाल आहे.