पावसामुळे मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी बंद, काही एक्स्प्रेस गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 08:41 PM2017-09-20T20:41:50+5:302017-09-20T20:42:17+5:30
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर पाणी साचल्याने 51 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
मुंबई, दि. 20 - मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तसेच, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर पाणी साचल्याने 51 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत विमानतळावरील मुख्य धावपट्टी बंद राहणार आहे. 14 क्रमांकाच्या धावपट्टीवरून काही प्रमाणात उड्डाणे होत आहेत. तर, दुसरीकडे सततच्या पावसामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणा-या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या जोरदार पावसाचा फटका विमान प्रवाशांसह एक्स्प्रेसच्या प्रवाशांना बसला असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई विमानतळावर पावसामुळे अक्षरश: तळे साचल्याने विमानांच्या उड्डाणांना अडथळे येत आहेत.
Mumbai: NOTAM for closure of main runway at Chhatrapati Shivaji International Airport extended up to 0600 hrs tomorrow
— ANI (@ANI) September 20, 2017
विमानतळावरील काही भागच सध्या सुरु असून इतर अनेक धावपट्ट्यांवर पाणी साचल्याने येथील वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बाहेरुन येणाऱ्या अनेक विमानांच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आले असून ती इतर विमानतळांवर वळवण्यात आली आहेत. दरम्यान, देशातंर्गत हवाई सेवा पुरवणाऱ्या विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्याची किंवा उड्डाणाचे वेळापत्रक बदलून देण्याची तयारी दर्शविली आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणा-या काही एक्स्प्रेस गाड्या आज आणि उद्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये आजची डेक्कन आणि सिंहगड एक्स्प्रेस आहे. तर, उद्याची मनमाड-सीएसटीएम राज्यराणी आणि गोदावरी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
या पावसाने मुंबईत दाणादाण उडवली आहे. याचा फटका लोकल वाहतुकीवर सुद्धा झाला आहे. लोकलच्या तिनही मार्गावर गाड्या उशिराने धावत आहेत. तर, वसई-विरार-पालघर पट्ट्यात तुफान पाऊस कोसळत आहे. नालासोपारा येथील नेवाळे ते देसाईवाडी भागातील चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेले असून यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. तर, मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे.