मुंबई : मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीच्या महत्त्वाच्या दुरुस्ती कामासाठी ही धावपट्टी १ नोव्हेंबर, २०१९ ते २८ मार्च, २०२० या कालावधीत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तब्बल ५ महिने बंद ठेवण्यात येईल. या कालावधीत दर सोमवार ते शनिवारपर्यंत धावपट्टी बंद राहील. केवळ रविवारी धावपट्टी वापरासाठी खुली करण्यात येईल. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ०९-२७ ही मुख्य धावपट्टी आहे. ज्यावेळी मुख्य धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू असते, तेव्हा १४-३२ या दुसऱ्या धावपट्टीचा वापर विमान वाहतुकीसाठी केला जातो. दुरुस्तीच्या कामावेळी रविवारी मुख्य धावपट्टीचा वापर केला जाईल. या व्यतिरिक्त २५ डिसेंबर, १ जानेवारी, १५, १९ जानेवारी, २१ फेब्रुवारी, १० मार्च व २५ मार्च या दिवशी मुख्य धावपट्टी वापरात असेल. मुख्य धावपट्टीपेक्षा दुय्यम धावपट्टीची लांबी कमी असल्याने त्याचा वापर शक्यतो कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे अनेक विमानांना मार्ग बदलावा लागणार आहे, तर अनेक विमानांना विलंब होण्याची शक्यता आहे.
मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी सुमारे पाच महिने बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 2:25 AM