Join us  

प्रत्येक लोककला टिकविण्याचे आणि जोपासण्याचे काम करणार

By admin | Published: March 05, 2017 3:35 AM

महाराष्ट्राची ओळख असलेले लोककलेचे वैभव फार मोठे आहे. या लोककलेचे जतन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे लोककला टिकविण्याचे आणि लोक

मुंबई : महाराष्ट्राची ओळख असलेले लोककलेचे वैभव फार मोठे आहे. या लोककलेचे जतन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे लोककला टिकविण्याचे आणि लोक कलाकारालाही जोपासण्याचे काम करू, असे उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी काढले. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे वितरण रवींद्र नाट्य मंदिराच्या कलांगणात शानदारपणे करण्यात आले. याप्रसंगी तावडे म्हणाले की, लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. परंतु हे लोककलेची वास्तव सध्या कमी प्रमाणात रसिकांसमोर येत आहे. त्यामुळे लोप न पावता या ऐतिहासिक लोककलांचे जतन करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. हे काम आत जवळ जवळ ६५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे युवा पिढीला लोककला म्हणजे काय आणि त्या लोककलेचे महत्त्व या जतनाच्या कामातून कळू शकेल, असा विश्वास तावडे यानी व्यक्त केला.लोककला ही जनमानसात लोकप्रिय असली तरीही अन्य कलेप्रमाणे या लोककलेचा सुयोग्य अभ्यासक्रम दिसत नाही. त्यामुळे लोककला शिकविण्याच्या दृष्टीने नजीकच्या काळात लोककलेचा योग्य अभ्यासक्रम तयार करता येईल का? व हा अभ्यासक्रम विविध शिक्षण संस्थामार्फत शिकविता येईल का? याचा विचारही नजीकच्या काळात राज्य सरकार करेल, असेही तावडे यांनी सांगितले.याप्रसंगी राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे मानकरी किशोर नांदलस्कर (नाटक), पं. उपेंद्र भट (कंठसंगीत), पं. रमेश कानोले (उपशास्त्रीय संगीत), भालचंद्र कुलकर्णी (मराठी चित्रपट), पांडुरंग जाधव (कीर्तन), मधुकर बांते (तमाशा), शाहीर इंद्रायणी आत्माराम पाटील (शाहिरी), सुखदेव साठे (नृत्य), भागुजी प्रधान (लोककला), सोनू ढवळू म्हसे (आदिवासी गिरीजन) आणि प्रभाकर भावे (कलादान) यांना शानदार समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार पुरस्कार्थींना त्या त्या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि नामवंत व्यक्तींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप रुपये १ लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे आहे. या वेळी केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी मनोज जोशी (अभिनय), हिमानी शिवपुरी (अभिनय), प्रदीप मुळ्ये (प्रायोगिक नाट्यकला), छाया खुटेगावकर आणि माया खुटेगावकर (लावणी) या पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कार करण्यात आला. शफाअत खान (नाट्यलेखन) यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी रुक्साना खान यांनी सत्कार स्वीकारला. या सोहळ्याच्या निमित्ताने ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.‘सनी’चा विशेष सन्मान आॅस्कर सोहळ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा आणि सांताक्रुझ कलिना येथील वस्तीत राहणारा सनी पवार या बालकलाकाराला ‘लायन’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.