मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून महालक्ष्मी रेसकोर्सवर तरुण खेळाडू, छंद जोपासणारे घोडेस्वारी आणि पोलो या खेळाचा आनंद घेत आहेत. याचा सराव येथे करत आहेत. मात्र, जूनमध्ये ही जागा पालिका ताब्यात घेणार असून तेथे जागतिक स्तराचे पार्क उभे करणार आहे. त्यामुळे पार्कच्या आराखड्यात प्रशिक्षण देणाऱ्या अमॅच्योर रायडर्स क्लब (एआरसी) क्लबचा समावेश करावा, अशी मागणी येथील सदस्यांकडून होत आहे.
महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा राज्य शासन व मुंबई महापालिका यांच्या मालकीची आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या जागेचाही यात समावेश आहे. या जागेत यापूर्वी पोलो क्लब आणि घोडेस्वारीचा सराव करणाऱ्या खेळाडूंचा प्रवेश यामुळे निषिद्ध होईल. त्यामुळे तो सुरू राहण्यासाठी या क्लबचाही पार्कच्या नियोजनात समावेश करावा, अशी मागणी करणारे पत्र माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिले आहे. रेसकोर्सच्या जमिनी हस्तांतरण करून घेताना नवीन भाडे करारात एआरसी क्लबचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय आहे एआरसी क्लब?
१९४२ पासून एआरसी क्लबने मुंबईकरांच्या अनेक पिढ्यांना घोडस्वारी आणि पोलोचे प्रशिक्षण दिले आहे. रेसकोर्सच्या जमिनीवर सुमारे ९०*६० मीटरच्या परिसरात हे कार्यरत असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण आहे. भारतातील हा एकमेव नागरी क्लब आहे, ज्यात ड्रेसेज, शो जंपिंग, माउंटेड स्पोर्ट आणि पोलोसाठी पायाभूत सुविधा आहेत. या क्लबनेच देशाला ऑलिम्पिक, आशियाई खेळांचे चॅम्पियन दिले आहेत. एआरसी रेसकोर्समधून काढून टाकल्यास मुंबई शहरातील प्रतिभावंत खेळाडू या खेळापासून वंचित राहून दिशाहीन होतील. त्यामुळे पालिकेने याचा विचार करून हा उपक्रम पार्कमध्ये समाविष्ट केला तर त्यांना आणखी चांगल्या संधी उपलब्ध करून देता येतील, असे म्हणणे नार्वेकरांनी मांडले आहे.