Join us

खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या तिजोरीला चर

By admin | Published: December 04, 2014 1:26 AM

उपयोगिता सेवा संस्थांनी खणलेले चर बुजविण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांनीच पालिकेच्या तिजोरीला चर मारली असल्याचे उजेडात आले

मुंबई : उपयोगिता सेवा संस्थांनी खणलेले चर बुजविण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांनीच पालिकेच्या तिजोरीला चर मारली असल्याचे उजेडात आले आहे़ अंदाजित खर्चापेक्षा ४८ टक्के कमी खर्च दाखवून कंत्राट पदरात पाडून घेतल्यानंतर या ठेकेदाराने आता तब्बल २७८ कोटींचे बिल तयार केले आहे़ या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून जोर धरू लागली आहे़मुंबईतील २८ उपयोगिता सेवा संस्था केबल वाहिन्या टाकण्यासाठी चर खोदत असतात़ हे चर बुजविण्यासाठी पालिका संबंधित संस्थांना शुल्क आकारत असते़ त्यानुसार जानेवारी महिन्यात ७१ कोटींचे कंत्राट देण्यात आले होते़ ४८ टक्के कमी खर्चाच्या या निविदेमुळे कामाच्या दर्जावर विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केली होती़ मात्र त्यानंतरही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता़ परंतु जुलै महिन्यात १४० कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने पटलावर आणला़ तो मंजूर करून ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली़ मात्र आता हे काम २७८ कोटींवर पोहोचल्याचा प्रस्ताव ठेकेदाराने ठेवला आहे़ यामुळे फेरनिविदा न मागविता वाढीव रकमेचे कंत्राट त्याच ठेकेदाराला दिलेच कसे, असा जाब आता विरोधी पक्ष विचारत आहेत़ हे कंत्राट रद्द करून फेरनिविदेद्वारे नवीन ठेकेदार नेमण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे़ अन्यथा या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़आर. श्रीनिवास यांना दिला आहे़ (प्रतिनिधी)