किनारा परिसर संवर्धनासाठी १७५ कोटी रुपये
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प - भाग ३
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प म्हणजे काेस्टल राेडचे काम करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. सागरी जीवसृष्टीच्या उत्पत्ती व वाढीसाठी नैसर्गिक सामान जसे की, नैसर्गिक दगड, मातीचाच वापर हाेत आहे. किनाऱ्यालगतच्या कांदळवनाचे संवर्धन करण्यात येत आहे. किनारा परिसर संवर्धनासाठी पालिकेने १७५ कोटींचा निधी शासनाकडे जमा केला आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ७२१ कोटींचा खर्च अपेक्षित असून, पालिकेने कुठलाही टोल न आकारता आपल्या बजेटमधून आर्थिक तरतूद करुन खर्च भागवण्याचे निश्चित केले आहे.
पालिकेने हाती घेतलेल्या किनारी रस्त्याचे काम प्रियदर्शिनी गार्डन ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत केले जाईल. त्यासाठी समुद्रात भराव घालून जमीन तयार करुन त्यावरुन रस्ता, प्रोमेनाईड व उर्वरित भागावर बाग व उद्याने उभारण्यात येतील. सध्याच्या किनाऱ्यापासून सुमारे ७० ते १०० मीटर रुंदीचा भराव घालण्यात येईल. समुद्री जीवन व जैवविविधता ही समुद्रतळाच्या पृष्ठभागावर अवलंबून असते. ताे भरावामुळे गाडल्याने तेथील जैवविविधता धाेक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता सखोल अभ्यासाअंती भरावाचे काम नैसर्गिक दगड, रॉक आर्मोरससारख्या साहित्याच्या आधारे केले जाईल. जेणेकरून सागरी जीवसृष्टी वाढीस मदत होईल.
अमरसन गार्डन, टाटा गार्डन, महालक्ष्मी मंदिरामागे, हाजी अली दर्गा, लव्हग्रोव नाला, वरळी सी फेस येथील समुद्रकिनारा नैसर्गिक दगडाच्या (तुकडे) सामानाने भरण्यात येत आहे. भरावाचे लाटांपासून संरक्षण करण्यासाठी व सागरी जीवसृष्टीच्या विकासासाठी मोठ्या आकाराच्या नैसर्गिक दगडांची भिंत बांधण्यात येत आहे. कोरल ही सागरी जैवविविधतेसाठी उपयुक्त असलेली सागरी प्रवाळ प्रजाती आहे. पर्यटनाच्या दृष्टिकाेनातूनही याला महत्त्व आहे. त्यामुळेच समुद्र किनाऱ्यालगत भरती, ओहोटी दरम्यानच्या भागांमधील कोरलचे अस्तित्व, उपस्थिती किंवा अनुपस्थितीचे परीक्षण करुन फोटोग्राफी आणि व्हिडिओ दस्तऐवजीकरण करण्यात आले. प्रकल्प साइट वरळी क्षेत्रात सुमारे ०.२५१ चौरस मीटर क्षेत्र व्यापलेले कोरल सापडले. हाजी अली क्षेत्रात सुमारे ०.११ चौरस मीटर क्षेत्र व्यापलेले कोरल सापडले. प्रवाळांच्या स्थित्यंतरासाठी परवानगी घेण्यात आली. कोरल स्थित्यंतर कार्यक्रम वन विभाग अधिकारी व मॅनग्रोव्ह फाउंडेशन प्रतिनिधींच्या पर्यवेक्षणाखाली शास्त्रीय पद्धतीने पूर्ण केल्याची माहिती पालिकेने दिली.
* अहवालानुसार उपाययाेजनांवर भर
सागरी किनारा रस्ता प्रकल्प करताना पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून पर्यावरणाचा समतोल राखण्यावर सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्याकरिता अहवाल देण्यासाठी पालिकेने शासकीय संस्थेची नेमणूक केली. संस्थेने समुद्र लाटांचा अभ्यास, समुद्र भरतीची वाढत राहणारी पातळी, किनाऱ्यावर भराव केल्याने होणारे परिणाम, सागरी जीवसृष्टीवर होणारे परिणाम इत्यादींचा सखोल अभ्यास करुन त्यावरील उपाययोजनांसंबधी सविस्तर अहवाल तयार केला. त्यानुसार उपाययोजना केल्या जात आहेत.
- शंकर ज. भोसले,
कार्यकारी अभियंता, किनारी रस्ता, मुंबई महापालिका