मुंबई : यावर्षी बेस्ट उपक्रमातील कामगारांना सानुग्रह अनुदान मागण्यापूर्वीच जाहीर झाला. परंतु तो पदरात पडण्याची शक्यता मात्र धूसर आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे सामंजस्य करारावर सही न करणाऱ्या कामगारांना सानुग्रह अनुदान देणार नाही, अशी चेतावनीच बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यामुळे कृती समितीने न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. तर ९ आॅक्टोबर रोजी संप अटळ असल्याचेही जाहीर केले आहे.बेस्ट कामगारांना यावर्षी नऊ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासनामध्ये वेतन कराराबाबत सामंजस्य करार झाला. या सामंजस्य करारावर कामगारांनी सही न केल्यास सानुग्रह अनुदान मिळणार नाही, असा इशारा देणारे ई मेलद्वारे प्रशासनाने अधिकाऱ्यांना पाठविले आहे. या मेलमुळे बेस्ट कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाचा हा दबावतंत्र खपवून घेणार नाही, या विरोधात न्यायालयात दाद मागणार असे बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले.
बेस्ट कामगारांचे सानुग्रह अनुदान रखडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 3:50 AM