Join us

उष्णतेच्या झळा कायम

By admin | Published: November 10, 2015 12:27 AM

मुंबई आणि उपनगरांत दिवाळीची लगबग सुरू झाली असली तरी थंडीची मात्र मुंबईकरांना अद्यापही चाहूल लागलेली नाही. वातावरणातील बदल याला कारणीभूत असून

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत दिवाळीची लगबग सुरू झाली असली तरी थंडीची मात्र मुंबईकरांना अद्यापही चाहूल लागलेली नाही. वातावरणातील बदल याला कारणीभूत असून, येथे थंडीऐवजी उकाडाच अधिक जाणवत आहे. मागील तीन दिवसांपासून शहराचे कमाल तापमान ३४-३६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे किमान तापमानातही फारसा फरक पडलेला नाही. परिणामी, ऐन थंडीतही मुंबईकरांना कमाल तापमानाच्या झळा सोसाव्या लागत असून, वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.जम्मू-काश्मीरमध्ये आठवडा भरापूर्वीच बर्फवृष्टीला सुरुवात झाली असून, उत्तरेकडे थंडीची काहीशी चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात मात्र दिवाळी आली तरी थंडीने हातपाय पसरलेले नाहीत. उलटपक्षी मागील तीन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४-३६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. शिवाय दुपारी पडणारे कडाक्याचे ऊन मुंबईकरांचा घाम काढत आहे. शहराचे किमान तापमान २० अंशांवर घसरले असले तरीदेखील थंडीच्या तुलनेत वातावरणात फारसा काही फरक पडलेला नाही. शिवाय पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २३ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी सध्या तरी मुंबईकरांना थंडीऐवजी उकाड्यालाच सामोरे जावे लागणार आहे. दुसरीकडे भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य-पूर्व अरबी समुद्रात असलेल्या ‘मेघ’ या चक्रीवादळाची स्थिती कायम आहे. (प्रतिनिधी)