‘मन्नत’च्या सुरक्षारक्षकाची जन्मठेप कायम
By admin | Published: July 3, 2016 02:00 AM2016-07-03T02:00:54+5:302016-07-03T02:00:54+5:30
क्षुल्लक कारणास्तव सहकाऱ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याप्रकरणी ‘मन्नत’ बंगल्याच्या सुरक्षारक्षकाच्या जन्मठेपेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. २००६ मध्ये अभिनेता
मुंबई : क्षुल्लक कारणास्तव सहकाऱ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याप्रकरणी ‘मन्नत’ बंगल्याच्या सुरक्षारक्षकाच्या जन्मठेपेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. २००६ मध्ये अभिनेता शाहरूख खानच्या बंगल्याच्या बाहेर ही घटना घडली होती.
आपण केलेल्या कृत्याचा परिणाम काय होईल आणि जखमी व्यक्तीचे काय होईल, याची पूर्ण कल्पना आरोपीला होती, असे न्या. व्ही. के. ताहिलरमाणी व न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने सांगितले.
२००९ मध्ये सत्र न्यायालयाने यतेंद्रसिंग चौहान याला सहकाऱ्याची हत्या केल्याबद्दल जन्मठेप ठोठावली होती. त्यास चौहानने उच्च न्यायालयात आव्हान दिले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार संदीप लाखन याच्या साक्षीत तारतम्य नसल्याने ती स्वीकारू नये. कट पूर्वनियोजित नव्हता. त्यामुळे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली शिक्षा ठोठावावी, अशी विनंती चौहान याने खंडपीठाला केली.
लाखनच्या साक्षीमध्ये खंडपीठाला थोडी विसंगती आढळली. हत्या पूर्वनियोजित नसली तरी हे प्रकरण अचानकपणे राग आल्याचे किंवा चिथावणी दिल्याचेही नाही. आरोपी सुरक्षारक्षक होता. रिव्हॉल्वरचा परवाना त्याच्याकडे होता. शस्त्राची ताकद काय आहे. त्याची त्याला पूर्ण कल्पना होती, असे खंडपीठाने चौहानची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना सांगितले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आणि मृत व्यक्ती ‘टॉप सिक्युरिटी’मध्ये कामाला होते. शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून दोघांची नेमणूक झालेली होती. १४ आॅगस्ट २००६ च्या रात्री मृत्यू झालेल्या चंद्रप्रताप सिंगने चौहानला रिकामटेकडा बसल्याबद्दल विचारणा केली. ‘बसून का राहिलास? रिव्हॉल्वर लोड केलीस का?’ अशी विचारणा चंद्रपाताप सिंगने चौहानकडे केली. त्यामुळे संतापलेल्या चौहानने चंद्रप्रतापच्या छातीवर काडतुसांनी भरलेली रिव्हॉल्वर ठेवली आणि तिचा ट्रिगर दाबला. गोळीचा आवाज ऐकून बाकीचे सुरक्षारक्षक धावत आले. त्यांनी चंद्रप्रतापला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चौहानविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला होता. (प्रतिनिधी)