मजास, मोगरा झोपडपट्टींचे बायोमेट्रिक सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:34 AM2018-03-15T02:34:54+5:302018-03-15T02:34:54+5:30
मुंबईतील ७० लाख झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्धार केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि मुंबई मनपाने जोगेश्वरी पूर्वेकडील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणास बुधवारी सुरुवात केली.
मुंबई : मुंबईतील ७० लाख झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्धार केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि मुंबई मनपाने जोगेश्वरी पूर्वेकडील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणास बुधवारी सुरुवात केली. येथील मजास आणि मोगरा येथील झोपडपट्ट्यांमधून प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी १७८ झोपड्यांची नोंदणी आणि ६५हून अधिक कुटुंबांचे बायोमेट्रिक झाल्याची माहिती आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी ७० हजारहून अधिक झोपड्या आणि १२ हजारांहून अधिक बांधकामे आहेत. त्यांची नोंदणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मात्र, पहिल्याच दिवशी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने हा प्रकल्प यशस्वी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
शहरातील वाढत्या झोपडपट्टीला आळा घालण्यासाठी या सर्वेक्षणाची सुरुवात झाली आहे. त्यात मजास आणि मोगरा विभागात सुमारे ३० झोपडपट्टी गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. धारावीनंतरची मोठी झोपडपट्टी म्हणून या विभागाकडे पाहिले जाते. त्यामुळे गेल्या काही दशकांपासून येथील पुनर्विकासही रखडला आहे. तो मार्गी लावण्यासाठी हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
या कामात एसआरएला मनपा प्रशासनाची मोलाची मदत होत आहे. डोअर टू डोअर बायोमेट्रिक सर्वेक्षणाला लोकांचाही प्रतिसाद मिळत आहे.
या प्रकल्पामुळे झोपड्यांची योग्य गणना होऊन नव्याने निर्माण होणाऱ्या झोपड्यांना आळा बसणार आहे. तसेच प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला राहण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.
स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी झोपड्यांची गणना महत्त्वाची असून त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.