एकनाथ शिंदेंना समर्थन देणाऱ्यांवर मोठी कारवाई, नवी मुंबईतील दोन बड्या नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 12:08 PM2022-07-09T12:08:28+5:302022-07-09T12:09:39+5:30
Shiv Sena: शिंदे गटाल मिळत असलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रीय झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, शिंदेंना साथ देणाऱ्या नवी मुंबईतील दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मुंबई - एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला प्रमुख शहरांसह विविध भागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रीय झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, शिंदेंना साथ देणाऱ्या नवी मुंबईतील दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेतील ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर नवी मुंबईतीलही अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना समर्थन देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, या घडामोडींनंतर शिवसेना पक्षनेतृत्वाने नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते विजय चौगुले आणि विजय नाहटा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, आमदारांच्या बंडखोरीनंतर नवे नेतृत्व पुढे आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अर्जुन खोतकर यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. पुढच्या काळात शिवसेनेतील विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची भरती होणार आहे.