Join us

मोठी कारवाई: संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीची टाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 7:58 AM

Sanjay Raut: मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची ११.१५ कोटींच्या मालमत्ता जप्त केली.

 मुंबई : मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची ११.१५ कोटींच्या मालमत्ता जप्त केली. जप्त मालमत्तांत राऊत यांच्या पत्नीच्या नावावरील दादरच्या फ्लॅटसह निकटवर्तीयांच्या रायगड व पालघरमधील मालमत्तांचा समावेश आहे. प्रवीण राऊत यांच्या नावे असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीसह राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत तसेच स्वप्ना पाटकर या दोघींच्या नावावरील अलिबागमधील किहिम बीच येथील ८ प्लॉटसह वर्षा राऊत यांच्या नावावरील दादर येथील फ्लॅटवर ईडीने टाच आणली. राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या स्वप्ना पाटकर पत्नी आहेत. किहिम बीच येथील ८ प्लॉटच्या खरेदी व्यवहारात नोंदणी, इतर बाबींचे रोख व्यवहार झाले आहेत.कारवाईला घाबरत नाहीमाझे राहते घर व स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने भाजपला उकळ्या फुटत असेल, अशा कारवाईला मी घाबरत नाही. १ रूपया जरी अवैध असेल तर ती संपत्ती भाजपला दान करेल. महाराष्ट्रात सेनेसोबत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या मला दिल्या. महाराष्ट्रातही लवकरच कारवाईचे सत्र पाहायला मिळेल.     - संजय राऊत, शिवसेना नेते लोकशाहीचे नव्हे, दबावशाहीचे वातावरण केंद्रीय यंत्रणांची कारवाई राजकीय हेतूने सुरू आहे. राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईत सूडबुद्धी स्पष्ट दिसत आहे. सध्या देशात जे काही सुरू आहे ते लोकशाहीचे नव्हे, तर दबावशाहीचे वातावरण आहे. शिवसेना भाजपसोबत गेली नाही, त्यामुळे या कारवाया सुरू आहेत.    - आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्रीराऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न शिवसेना खा. संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते. या कारवायांच्या माध्यमातून राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.     - जयंत पाटील, मंत्री   

ही कारवाई राजकीय सूडभावनेतूनसंजय राऊत यांच्या संपत्तीवर केलेली जप्तीची कारवाई ही राजकीय सूडभावनेतून केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने भाजपचे नेते त्रस्त झालेले आहेत. या निराशेतून ईडीला हाताशी धरून खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे.    - विनायक राऊत, शिवसेना गटनेते, लोकसभा

भ्रष्टाचार केला नसेल, तर घाबरता कशाला?एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरता कशाला, कोर्टात जा. तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्या. संजय राऊतच नव्हे तर महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांची मोठी यादीच आहे.     - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप 

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालय