मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांच्या नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ६७८ नवे कोरोनाबाधित आढळले असून ६२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार ६०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६ लाख ७४ हजार ७२ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १० हजार ४३ जण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईतील रिकव्हर रेट वाढला असून तो ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या ४८ हजार ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के इतका आहे. १ मे ते ९ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर ०.४६ टक्के इतका असून दुप्पटीचा दर १४५ दिवसांवर आहे. मुंबईतील सक्रिय कंटेन्मेंट झाने ९३ आहेत, तर सक्रिय सीलबंदी इमारती ५८१ आहेत.
मुंबईत दिवसभरात ३३ हजार ३७८ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५६ लाख ७७ हजार ७८० जणांचा लसीकरण पार पडले आहे. दरम्यान शनिवारी मृत्यू झालेल्या ६२ रुग्णांपैकी ३२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच यामध्ये ३७ रुग्ण पुरुष आणि २५ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते. तर ३८ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २१ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.