मालवणी पत्रकार हल्ल्याप्रकरणी मुख्य ड्रग्ज विक्रेत्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:06 AM2021-07-26T04:06:04+5:302021-07-26T04:06:04+5:30
मुंबई : हिंदी साप्ताहिकाचे पत्रकार राजकिशोर तिवारी (३८) यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी हुसेन नामक ड्रग्ज विक्रेत्याला अटक केली. ...
मुंबई : हिंदी साप्ताहिकाचे पत्रकार राजकिशोर तिवारी (३८) यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी हुसेन नामक ड्रग्ज विक्रेत्याला अटक केली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तिवारी यांच्यावर हुसेन आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचार करून त्यांना ऑस्कर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान संहिता ३९४ सह अन्य कलमे लावण्यात आली आहेत.
या प्रकारामुळे परिमंडळ ११ च्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पत्रकार आणि वकिलांवर असे दिवसाढवळ्या हल्ले होत असल्याने पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांचे यावर नियंत्रण नसल्याचे उघड होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष देत यावर अंकुश लावावा, अशी मागणी पत्रकार वर्गाकडून केली जात आहे. कमल तलाव परिसरात उघडपणे सुरू असलेली अमली पदार्थ विक्री तिवारी यांनी उघड केल्याने त्याच रागात हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या वर्षी झालेल्या हल्ल्यांच्या घटना :
२० जून : बाबू टोपी नामक अमली पदार्थ विक्रेत्याने शेजारी राहणाऱ्या मनोज यादव यांच्या छपरावर अमली पदार्थ लपविण्याचा प्रयत्न केला. त्याचा विरोध केल्याने यादव कुटुंबातील सात जणांवर तलवारीने हल्ला करण्यात आला.
३ जुलै : पोलीस नियंत्रण कक्षात अमली पदार्थ विक्रेत्यांची तक्रार दिली त्यामुळे गर्दुल्ल्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. याबाबत एनसी दाखल करण्यात आली आहे.
५ जुलै : मालवणीत प्रहार जनशक्ती कार्यालय उद्घाटनाच्या वेळी हल्ला करत त्याची तोडफोड करण्यात आली. मंत्री बच्चू कडू यांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली.
१८ जुलै : एमएचबी परिसरात क्लाइंटची जमीन पाहायला गेलेले वकील सत्यदेव जोशी यांच्यावर ४० ते ५० गुंडांनी दिवसाढवळ्या तलवारीने हल्ला केला. त्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.