मुंबई- अरुणाचल प्रदेशमधल्या तवांगमध्ये विरारच्या मेजर प्रसाद महाडिक यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला . 31 वर्षांच्या मेजर प्रसाद महाडिक यांचं पार्थिव उद्या त्यांच्या राहत्या घरी विरारमधल्या बोळिंज नाक्यावरील यशवंत सोसायटीत आणण्यात येणार आहे.सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरचे असलेल्या महाडिक यांची ऑक्टोबर 2017मध्ये तवांग येथे बदली झाली होती. 30 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान तवांगमध्ये ते राहत असलेल्या घराला अचानक आग लागली. त्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव उद्या विरारमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते नरेंद्र विसपुते यांनी दिली आहे. महाडिक यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आई-वडील आहेत. महाडिक हे 2012मध्ये लष्करात भरती झाले होते. अडीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांचे वडील नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरी करतात.
विरार पश्चिम येथील स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर लष्करी मानवंदनेसह अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी लष्कराचे अधिकारीही उपस्थित राहणार असून प्रांताधिकारी, जिल्हाधिकारीही उपस्थित राहतील, अशी माहिती वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.