मुंबई - राष्ट्रवादी कोणाची, म्हणजे पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे याचा निकाल निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच दिला आहे. त्यानंतर, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या आमदार अपात्रतेवरील निकाल वाचनाला विधानसभा अध्यक्षांनी ५ वाजताच्या सुमारास सुरुवात केली. यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील आमदार अपात्रेतवर सुनावणी करतेवेळी कुणालाही अपात्र ठरवलं नाही. त्यामुळे, आजही निकाल काय असेल, याची उत्सुकता सर्वांना होती. त्यानुसार, अगोदर मूळ पक्ष ठरवल्यानंतरच अपात्रतेचा निकाल देणार असल्याचं अध्यक्षांनी म्हटलं. अजित पवार गटाला ४१ आमदारांचं समर्थन असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला. म्हणजेच, अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे अध्यक्षांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचा संदर्भ देत आणि आमदारांच्या संख्याबळातील बहुसंख्येच्या आधारे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यामध्ये, पक्षाचे स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील आकलन व नेतेपदाची संरचना लक्षात घेण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवारा गटाला बहुमत स्वीकारलं जात नाही, असे नार्वेकर यांनी म्हटलं.तसेच, मूळ पक्ष हा विधिमंडळ बहुमतावर ठरणार असल्याचे सांगत अजित पवार गटाला ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याने अध्यक्षांनी हा निर्णय दिला. आता, आमदार अपात्रतेवर काय निर्णय येणार, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले. त्यानंतर, अध्यक्षांनी आज निकाल वाचन केले. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता.