सायन कोळीवाडा मतदार संघात दक्षिण भारतीय मतदारांची एकगठ्ठा मते ठरतात निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 05:40 AM2019-08-18T05:40:38+5:302019-08-18T05:40:57+5:30

- शेफाली परब-पंडित मुंबई : दक्षिण भारतीय मतदारांची एक गठ्ठा मतेच सायन कोळीवाडा मतदारसंघात निर्णायक ठरली आहेत. काँग्रेसचा हा ...

 The majority of South Indian voters in the Sion Koliwada constituency are deciding votes | सायन कोळीवाडा मतदार संघात दक्षिण भारतीय मतदारांची एकगठ्ठा मते ठरतात निर्णायक

सायन कोळीवाडा मतदार संघात दक्षिण भारतीय मतदारांची एकगठ्ठा मते ठरतात निर्णायक

Next

- शेफाली परब-पंडित

मुंबई : दक्षिण भारतीय मतदारांची एक गठ्ठा मतेच सायन कोळीवाडा मतदारसंघात निर्णायक ठरली आहेत. काँग्रेसचा हा गड काबीज करण्यासाठी भाजपने कॅप्टन तमिल सेल्वन यांना २०१४मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. नगरसेवकपदाच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना आमदारकीची लॉटरीही लागली. हा मतदारसंघ पुन्हा सर करण्यासाठी काँग्रेसची मोचेर्बांधणी सुरू आहे. दावेदार अधिक आणि अंतर्गत कलाहाचे आव्हान पक्षापुढे आहे.
या विभागात दक्षिण भारतीय बहुसंख्य असल्याने काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी निवडून येत होते. २००९मध्ये भाजपने मनिषा कायंदे यांना शेट्टींच्या विरोधात उतरविले. एक गठ्ठा मते पारड्यात पडल्यामुळे शेट्टींनी सुमारे १९ हजार मताधिक्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. दक्षिण भारतीयांची ही ताकद ओळखून भाजपने २०१४ मध्ये सेल्वन यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारापेक्षा १८ टक्के अधिक मतं मिळवून सेल्वन यांनी सायन कोळीवाडा गड खेचून आणला. हा गड परत मिळवण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
नुकतेच काँग्रेस पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष बनलेले दक्षिण मध्ये मुंबईचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक ५१ हजार ५०५ मतं सायन कोळीवाड्यातून मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघावर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ज्येष्ठ माजी नगरसेवक उपेंद्र दोशीही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे काँग्रेसच्या गोटातून समजते. महापालिकेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नगरसेवक रवि राजा येथून इच्छुक आहेत. नगरसेवकपदाची ही त्यांची पाचवी टर्म असल्याने ते पक्षातील प्रमुख दावेदार मानले जातात. मात्र काँग्रेसमधील अन्य काही इच्छुकांचीही तिकिट मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यात युवक काँग्रेसचे गणेश यादव यांची वर्णी लागण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभेत मोठा विजय मिळविणाऱ्या भाजपमध्ये अन्य राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी उड्या मारण्यास सुरूवात केली आहे. अशावेळी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसची कसोटी लागणार आहे. लोकसभेत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसला विधानसभेत ह्यहातह्ण भक्कम ठेवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत सायन कोळीवाड्यासारखे मतदारसंघच काँग्रेसची आशा कायम ठेवत आहेत. पक्षांतर्गत कलह, मोठ्या प्रमाणात सुरू असलेले पक्षांतर आणि ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांच्या मर्जीतले उमेदवार या वादामुळे काँग्रेसचा भाजपच्या उमेदवारासमोर निभाव लागणे जिकरीचे ठरणार आहे.
शिवसेनेने २०१४मध्ये मंगेश सातमकर यांना भाजप उमेदवाराच्या विरोधात उतरविले होते. त्यांनी दुसºया क्रमाकांची मतं मिळवली होती. अवघ्या तीन हजार मतांच्या फरकांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र युती झाल्यास हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, यावर त्यांचे तिकिट अवलंबून आहे. भाजपत इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी सेल्वन यांचे पक्षातील वजन अधिक आहे. राष्ट्रवादीतून मागची विधानसभा लढविणारे प्रसाद लाड आता भाजपात असल्याने त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडी येथे काही मतं कापण्याची शक्यता आहे. तर मनसे समर्थकांमुळे मराठी मतांचे येथे विभाजन होऊ शकते.
(उद्याच्या अंकात :
दिंडोशी मतदारसंघ)

- काँग्रेसच्या तिकिटावर सायन कोळीवाड्यातून दोन वेळा निवडून आलेले जगन्नाथ शेट्टी यांची हॅट्ट्रिक सेल्वन यांनी रोखली.
- २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आलेले कॅप्टन तमील सेल्वन यांना नगरसेवकपदाच्या पहिल्याच टर्ममध्ये आमदार बनण्याची संधी मिळाली.
- २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना सायन कोळीवाड्यातून ७० हजार मते मिळाली. तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना ५१ हजार मते मिळाली होती.

Web Title:  The majority of South Indian voters in the Sion Koliwada constituency are deciding votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान