Makar Sankranti 2018 : मकरसंक्रांत अशुभ नाही - दा. कृ. सोमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 06:05 AM2018-01-12T06:05:08+5:302018-01-12T06:05:22+5:30
येत्या रविवारी १४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत आहे. या मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ त्याच दिवशी दुपारी १:४६ पासून सूर्यास्तापर्यंत आहे. मकरसंक्रांतीचा आणि १४ जानेवारीचा तसा काहीही संबंध नाही. तसेच मकरसंक्रांती अशुभ नाही, असे पंचांगकर्ते खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
मुंबई : येत्या रविवारी १४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत आहे. या मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ त्याच दिवशी दुपारी १:४६ पासून सूर्यास्तापर्यंत आहे. मकरसंक्रांतीचा आणि १४ जानेवारीचा तसा काहीही संबंध नाही. तसेच मकरसंक्रांती अशुभ नाही, असे पंचांगकर्ते खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, २०८५पर्यंत मकरसंक्रांत कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येणार आहे. २१००पासून निरयन मकरसंक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. अशा रीतीने दिवस पुढे जात सन ३२४६मध्ये निरयन मकरसंक्रांती १ फेब्रुवारीला येणार आहे. पुढच्या वर्षी मकरसंक्रांती १५ जानेवारी २०१९ रोजी येणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.
२१ डिसेंबर रोजी जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश केला त्या दिवसापासूनच आपल्या येथे दिनमान वाढू लागले, उत्तरायणारंभ झाला. मकरसंक्रांतीपासून दिनमान वाढत जाते. ‘मकरसंक्रांती अशुभ असते’ असे जे म्हटले जाते ते चुकीचे आहे. दिनमान वाढत जाणे हे अशुभ कसे असू शकेल? वर्षभरात ज्यांच्याशी मतभेद किंवा भांडण झाले असेल त्यांना या दिवशी तीळगूळ देऊन गोड बोलण्यासंबंधी सांगितले जाते. मकरसंक्रांती पुण्यकाळात गरिबांना, गरजू लोकांना दान देण्यास सांगण्यात आले आहे, असेही सोमण यांनी सांगितले.
आकाश पक्ष्यांचेही असते
मकरसंक्रांतीला काळे वस्त्र नेसण्याची पद्धत आहे. काळ्या रंगाची वस्त्रे या थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवतात. पतंग उडवून दिनमान वाढत जाण्याचे स्वागत केले जाते. मात्र आकाश हे पक्षांचेही असते ही गोष्ट लक्षात घ्यावी. धारदार मांज्याचा वापर टाळावा, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.