Join us

मकरसंक्रांत : वीज वाहून नेणाऱ्या तारांजवळ पतंग उडवणे टाळा; वीज कंपन्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:14 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पतंग उडवण्यासाठी वापरला जातो तो मांजा विजेचा वाहक आहे. या मांजाच्या आवरणामध्ये धातूची भुकटी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पतंग उडवण्यासाठी वापरला जातो तो मांजा विजेचा वाहक आहे. या मांजाच्या आवरणामध्ये धातूची भुकटी वापरली असेल तर तो खूपच धोकादायक होतो. या मांजाचा ओव्हर हेड वाहक तारांना नुसता स्पर्श झाला किंवा तो या तारांच्या वक्र कक्षेत जरी आला तरी तो अति उच्च विद्युत दाबाचे वहन करू शकतो. त्यामुळे मनुष्यहानी होण्याची भीती असते. परिणामी, वीज वाहून नेत असलेल्या ओव्हर हेड वायरजवळ पतंग उडविणे टाळा, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.

मकरसंक्रांतीला मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. वर्सोवा, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरीवली येथे उच्च दाबाचे ओव्हरहेड पारेषण तारांचे जाळे आहे. अशा भागांत ओव्हर हेड वीज पारेषण तारांजवळ पतंग उडविणे टाळावे. पतंग उडविणाऱ्यांना उच्च दाबाच्या (हाय टेन्शन) ओव्हर हेड वीज पारेषण तारांपासून दूर राहण्याचा इशारा अदानी इलेक्ट्रिसिटीने दिला आहे. कारण, ओव्हर हेड वीज पारेषण तारांजवळ पतंग उडविणे जीवासाठी धोकादायक, मालमत्तेचे नुकसान करणारे आहे. शिवाय यामुळे पॉवर ग्रिडला हानी पोहोचून संपूर्ण शहर काळोखात जाण्याचा धोकाही आहे. यामुळे शॉर्टसर्किट होऊन केवळ वीजपुरवठा खंडित होणार नाही, तर गंभीर दुखापती होणे, प्राण जाणे किंवा पारेषण तारा तुटून अगदी ग्रिड बंद होईपर्यंत गंभीर घटना घडू शकतात.

------------------

- पारेषण तारांजवळ पतंग उडविणे प्राणघातक

- हे पॉवर ग्रिडसाठीही धोकादायक

- यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो

- घटना घडल्यास १९१२२ वर कळविण्याचे आवाहन

------------------