बाजारपेठांमध्ये मकर संक्रांतीची लगबग, महिलांना ओढ हलव्याच्या नाजूक दागिन्यांची
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 09:41 AM2024-01-13T09:41:38+5:302024-01-13T09:42:48+5:30
सुगड, तिळगूळ खरेदीसाठी गर्दी, मिक्स भाज्यांच्या खरेदीकडे कल.
मुंबई : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रातींची लगबग शहर उपनगरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. घराघरांत सुगडीपूजनासाठी लागणाऱ्या खरेदींची धामधूम सुरू असून त्यासह भोगीची तयारी, पूजेचे साहित्य आणि तिळगूळ खरेदीलाही उधाण आले आहे. फुलांच्या खरेदीपासून ते हलव्याच्या दागिन्यांना तरुणींपासून महिलावर्गाची पसंती मिळत आहे.
संक्रांतीसाठी गूळ, तीळ, बाजरीचे तयार पीठ आदी वस्तूंनाही मोठी मागणी झाली आहे. सुवासिनी सुगडामध्ये हंगामातील भाज्या, धान्य घालून पूजन करतात. भाजीमंडईतसह इतर ठिकाणी सुगड विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. सुगड खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी सुगड रंगवून विक्री केले जात होते. दादर, भायखळा, मालाड, लालबाग, मुलुंड या बाजारपेठांमध्ये महिला-तरुणींनी सुगड, गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, पाच फळे, तिळगूळ तसेच हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी लागणारे वाण, पूजेचे साहित्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची खरेदी करीत आहे. लहान मुलांसह तरुणांची पतंग खरेदीसाठी मशीद बंदर, क्राॅफर्ड मार्केट, दादर, लालबाग या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे.
पूजेच्या साहित्याला संमिश्र प्रतिसाद :
तिळाची वडी, तिळाचे लाडू, साखर, गुळाच्या वड्या, तिळाचा हलवा याच्या खरेदीसाठीही दुकानांमध्ये लगबग आहे. मुलांच्या बोरन्हाण्यासाठी लागणाऱ्या दागिन्यांसह रांगोळीची खरेदी करण्यात आली.
सुगड, पूजेच्या साहित्याच्या खरेदीला संमिश्र प्रतिसाद आहे. पाच सुगडांची किंमत ४० ते ६० रुपये आहे, तर पूजेच्या साहित्याची किंमत १०० ते १५० रुपये आहे, अशी माहिती विक्रेते मकरंद धोंडे यांनी दिली आहे.
भोगीच्या भाजीची तयारी जोरदार :
भोगीच्या भाजीसाठी वालपापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर आदींच्या खरेदीकरिता बाजारात गर्दी झाली होती. भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात दरवाढ झाली आहे. तयार मिक्स भाज्यांच्या खरेदीकडे गृहिणींचा कल राहिल्याचे भाजी विक्रेते दामोदर घोरपडे यांनी सांगितले. भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या खरेदीसाठी भायखळा घाऊक बाजारात सकाळपासून खरेदीदारांची गर्दी झाली होती.