मकरसंक्रांतीतील तिळाचा गोडवा वाढला
By Admin | Published: January 12, 2016 12:58 AM2016-01-12T00:58:27+5:302016-01-12T00:58:27+5:30
अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीला तिळाचा गोडवा आणखी वाढला असून, तिळाच्या दरात ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी २०० ते २२० रुपये
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीला तिळाचा गोडवा आणखी वाढला असून, तिळाच्या दरात ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी २०० ते २२० रुपये किलोने विकले जाणारे तीळ यावर्षी १२० ते १४० रुपये किलोच्या दराने उपलब्ध आहेत. तिळाचे भाव घसरल्याने यंदा संक्रांतीचा गोडवा आणखीच वाढला असून, महिलावर्गाने बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे.
लाल तिळाला सर्वाधिक मागणी असून गुजरातमधील चांगल्या दर्जाचे लाल तीळ १२० रुपये किलो या दराने बाजारात विकले जात आहे. याच लाल तिळाचे भाव मागील वर्षी २०० ते २२० रुपये किलो असून यंदा यामध्ये तब्बल ८० रुपयांची घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील खुले तीळ १०० ते ११० रुपये किलोने उपलब्ध आहेत. पांढरे तीळ १२० रुपये दराने विकले जात असून, आंध्रप्रदेशातील तीळ ९० ते १०० रुपये किलोने उपलब्ध असल्याची माहिती व्यापारी दिनेश पटेल यांनी दिली. पांढऱ्या आणि लाल तिळाचे विक्रमी उत्पादन झाल्याने यंदा दर घसरल्याचे पटेल यांनी सांगितले.
तिळाच्या लाडूची चव वाढविणाऱ्या शेंगदाण्याचेही भाव स्थिरावल्याने यावेळी निश्चितच संक्रांतीचा हा गोडवा प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळणार आहे. बाजारात चिक्कीचा गूळही २४० ते २५० प्रतिकिलो दराने विकले जात असून तिळाच्या लाडूसाठी लागणारे साहित्याचे दर घसरल्याने बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड लाडूच्या पाकिटाचे दरही कमी झाले असून १ किलो लाडूचे पाकीट ३१० ते ३३० रुपये दराने उपलब्ध आहे. त्याबरोबर रेडिमेड तिळाच्या पापड्या तसेच तिळाच्या वड्यांच्या किमतीही ४० ते ५० रुपयांनी घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येत्या रथसप्तमीपर्यंत तिळाची खरेदी सुरु राहणार असून मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दागिने हा महिलांच्या जिव्हाळ््याचा विषय. मकरसंक्रांतीनिमित्त बाजारात हलव्याचे काटेरी दागिनेही उपलब्ध असून लहान मुलांनाही हे हलव्याचे दागिने घालून सजविण्याची परंपरा आहे. बाजारात रेडिमेड हलव्याचे दागिने उपलब्ध असून महिलांची दागिने खरेदीची लगबग सुरू आहे.
बाजारात चिक्कीचा गूळही २४० ते २५० प्रतिकिलो दराने विकला जात असून रेडिमेड लाडूच्या पाकिटाचे दरही कमी झाले आहेत.