मकरंद अनासपुरेची राजकारणात उडी,‘शेतकरी वाचवा’ पक्षाची केली स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 02:43 AM2018-04-01T02:43:15+5:302018-04-01T02:52:49+5:30
आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता मकरंद अनासपुरेने आता राजकारणात येण्याचे टायमिंगही जवळपास फिक्स केले आहे.
मुंबई : आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता मकरंद अनासपुरेने आता राजकारणात येण्याचे टायमिंगही जवळपास फिक्स केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेला असताना, त्यांच्या हक्कांसाठी मकरंद अनासपुरेने आता राजकारणात उडी घ्यायचे ठरविले आहे. १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘शेतकरी वाचवा’ पक्षाची स्थापना मकरंद करणार असून, २०१९च्या लोेकसभा आणि विधानसभा निवडणुकाही आपण या पक्षामार्फत लढविणार असल्याचे सूतोवाचही मकरंदने केले आहे.
दक्षिण भारतात सिनेमातील सुपरस्टार्स राजकारणात येऊन यशस्वी होण्याची अनेक उदाहरणे आहेत. नुकतेच सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत यांनीही आपले राजकीय पक्ष काढले आहेत. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून मकरंदनेही महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं नशीब आजमावयचे ठरविले आहे. महाराष्ट्रातील सिनेसृष्टीतील एका सुपरस्टारने आपला स्वत:चा राजकीय पक्ष सुरू करण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.
‘नाम या संस्थेचे काम करत असताना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. इतकी वर्षे झाली, तरी महाराष्ट्रातील एकही राजकीय पक्षाला शेतकºयांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत. आजही महाराष्ट्रात शेतकºयांचे आत्महत्यासत्र सुरू असून, शेतकºयांना त्यांच्या न्यायहक्कांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि सत्तेत आल्यावर शेतकºयांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवूनच नंतर बाकीचे प्रश्न हाताळावेत, हा माझा आणि माझ्या पक्षाचा अजेंडा असेल,’ असे मत मकरंद अनासपुरेने व्यक्त केले आहे.
मकरंदच्या राजकीय पक्षाच्या घोषणेला महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटना आणि मान्यवरांनी आपला पाठिंबा आधीच दर्शविला आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही मकरंदच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. आता महाराष्ट्राच्या राजकारणात घट्ट पाय रोवून बसलेल्या राजकीय पक्षांना मकरंदचा नवीन पक्ष किती लढत देऊ पाहतो, हे आता येणारा काळच ठरवेल.
वाचकहो, थोडा धक्का बसला ना, बातमी वाचून. नेहमीच ‘सिरिअसली’ बातम्या वाचणाऱ्या वाचकांना हा गोड धक्का देण्याचा छोटासा प्रयत्न. निमित्त अर्थातच आजच्या ‘एप्रिल फूल’ चे. डोण्ड टेक इट सिरिअसली...