इस्रोत करिअर करा, फक्त सरकारी पगाराची तयारी ठेवा; एस. सोमनाथांचे IIT विद्यार्थ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 07:17 AM2023-12-29T07:17:33+5:302023-12-29T07:17:53+5:30
अनेक देश अंतराळातील पर्यटनाचे प्रयोग करत आहेत. इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित अंतराळ पर्यटनाचा पर्याय आपण देऊ, असे सोमनाथ यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आयआयटीयन्सनी परदेशी किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांत करिअरची स्वप्ने पाहणे चुकीचे नाही; परंतु इस्रोच्या आगामी योजनांसाठी विकसित रोबोटिक्स तंत्रज्ञांची गरज असून, आयआयटीयन्सनी त्यासाठी इस्रोत योगदान देण्याचा नक्कीच विचार करावा. पण सरकारी पगारात काम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी केले.
भारतीय अंतराळ स्थानक २०३५ पर्यंत उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इथे अंतराळविषयक संशोधनाचे काम होईल. त्यासाठी सुमारे ७०० टन इतके वजन पेलू शकेल असे आधुनिक तंत्राचे व नव्या दमाचे एनजीएलव्ही विकसित करण्याचे आव्हान इस्रोला पेलायचे आहे. इस्रो येत्या काळात हाती घेत असलेल्या मोहिमांकरिता तिसरे लाँचिंग पॅड उभारण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी भारतीय अंतराळ मोहिमांचा आढावा घेताना दिली. इतर क्षेत्रांप्रमाणे अंतराळ संशोधन क्षेत्रातही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (एआय) गरज भासेल. अंतराळ स्टेशनसाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाची गरज असून त्यासाठी इस्रोला आयआयटीयन्सची मदत लागेल, याची जाणीव त्यांनी तरुणांना करून दिली.
आदित्य एल १चा महत्त्वाचा टप्पा
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आदित्य एल-१ हे अवकाशयान ६ जानेवारीला लँगरेज बिंदू (एल १) वर पोहोचणार असल्याची माहिती सोमनाथ यांनी दिली. २ सप्टेंबरला आदित्य एल-१ हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने झेपावले होते.
पाच वर्षांत ५० उपग्रह
शत्रुराष्ट्राच्या सैन्याची हालचाल टिपण्याची क्षमता असलेले आणि एकूणच भू-गुप्तचर माहिती जमा करण्यासाठी सक्षम ठरतील अशा ५० उपग्रहांचे प्रक्षेपण येत्या पाच वर्षांत करणार असल्याची माहिती सोमनाथ यांनी इस्रोच्या पुढील वीस वर्षांतील योजनांचा आढावा घेताना दिली.
अंतराळ पर्यटन
सध्या अनेक देश अंतराळातील पर्यटनाचे प्रयोग करत आहेत. भारतही त्या दृष्टीने स्वत:ला तयार करत आहे. इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित असा अंतराळ पर्यटनाचा पर्याय आपण देऊ, असे सोमनाथ यांनी सांगितले.