Join us

लोकलसाठी स्वतंत्र प्राधिकरण करा, प्रवासी संघटनांची मागणी; पांढरे कपडे घालून कारभाराचा निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 6:17 AM

मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर लोकल सेवेच्या प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी पांढरे कपडे घालून आंदोलन करण्याची हाक दिली होती.

मुंबई : कोकण रेल्वेप्रमाणे मुंबईच्या लोकल रेल्वे वाहतुकीसाठी ‘ट्रान्सपोर्ट ऑफ मुंबई’ असे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा आणि गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या गाड्या लवकरात लवकर सुरू करा या दोन प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी गुरुवारी पांढरे कपडे परिधान करून निषेध आंदोलन केले.  

मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर लोकल सेवेच्या प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी पांढरे कपडे घालून आंदोलन करण्याची हाक दिली होती. त्यानुसार ठाणे आणि मुंबई परिसरातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. ठाण्यात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईतील रेल्वे प्रवासीही आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा रेल्वे प्रवासी संघटनांनी केला. 

संघटनांच्या वतीने गुरुवारी सकाळी काही स्थानकांवर रेल्वे प्रवाशांना काळ्याफिती वाटण्यात आल्या आणि त्या लावून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार अनेक रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. सुरक्षित लोकल रेल्वे प्रवास या मागणीसाठीचे गुरुवारचे पहिले आंदोलन शांततामय मार्गाने पार पडले. 

प्रवाशांच्या मागण्या  कळवा-ऐरोली लिंकसाठी एमएमआरडीने एमआरव्हीसीला त्वरित जागा हस्तांतरित करावी.  राज्य सरकारने रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.  रेल्वे प्रशासनाने सकाळी ७:३० ते १०:३० आणि सायंकाळी ५:३० ते ८:३० उशिराने येणाऱ्या  मेल एक्स्प्रेससाठी लोकलच्या वेळापत्रकाचा बळी देऊ नये.  लोकलसाठी बनवलेल्या ट्रॅकवर फक्त लोकलच चालवण्यात याव्यात. 

टॅग्स :मुंबई लोकल